हैदराबाद शहर गुरुवारी संध्याकाळी दोन शक्तीशाली स्फोटांनी हादरले. स्फोटात ११ जण मृत्युमुखी पडले असून, ५० जण जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हैदराबादमधील दिलसुखनगर भागात हे स्फोट झाले. सायकलवर स्फोटके ठेवण्यात आली होती. पहिला स्फोट सात वाजून दहा मिनिटांच्या सुमारास आणि दुसरा सव्वासातच्या सुमारास झाला. दिलसुखनगर बसस्टॉप आणि वेंकटाद्री व कोणार्क या दोन्ही चित्रपटगृहांजवळ हे स्फोट झाले. स्फोटाची तीव्रता मोठी होती, असे प्रत्यक्षदर्शींनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला.
स्फोट घडविण्यासाठी कशाचा वापर करण्यात आला होता, याची माहिती अजून मिळालेली नाही.
स्फोटानंतर पोलिसांकडून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात येत असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येते आहे. दिलसुखनगर भागात साईबाबांचे मंदिर आहे. गुरुवार असल्यामुळे तिथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. तेथूनच जवळ असलेल्या बसस्टॉपवर पहिला स्फोट झाला. वेंकटाद्री आणि कोणार्क ही दोन्ही चित्रपटगृहे जवळ असून, तेलगु चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपट बघण्यासाठी तिथे कायमच प्रेक्षकांची गर्दी असते. प्राथमिक माहितीनुसार, गर्दीची ठिकाणे हेरून तिथेच हे स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. स्फोटाच्या ठिकाणी एनएसजी आणि एनआयएचे पथक जाणार आहे, असे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी सांगितले.
देशात बॉम्बस्फोट होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून गेले दोन दिवसांपासून मिळत होती. त्याप्रमाणे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितले होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा