Delhi Crime : दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. ज्या डॉक्टरांनी उपचार केले, त्याच डॉक्टरांची हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हत्या करणारे आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यामुळे ही हत्या नेमकी का केली? कोणाच्या सांगण्यावरून केली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुरुवारी पहाटे दक्षिण पूर्व दिल्लीतील कालिंदी कुंज येथे असलेल्या एका लहान नर्सिंग होममध्ये हा प्रकार घडला. या नर्सिंग होममधील एका डॉक्टरला गोळ्या घालून ठार करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पहाटे १.४५ च्या सुमारास या गुन्ह्याची माहिती देण्यात आली.

डॉ. जावेद अख्तर यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, जिल्हा गुन्हे युनिट आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल), रोहिणी येथील फॉरेन्सिक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि त्यांनी विश्लेषणासाठी पुरावे गोळा केले.

हेही वाचा >> Isha Foundation Case: ‘अशा संस्थांमध्ये पोलिस किंवा सैन्य घुसवणं बरं नाही’; ईशा फाउंडेशनवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, साधारण १६-१७ वर्षे वयोगटातील दोन मुले मध्यरात्री १ वाजता रुग्णालयात आली. एका मुलाच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. या जखमी मुलाच्या बोटावर रुग्णालयातील कर्मचारी मोहम्मद कामिल यांनी ड्रेसिंग केले होते.

ड्रेसिंग केल्यानंतर दोघे डॉ. अख्तर यांच्या केबिनमध्ये प्रिस्क्रिप्शनसाठी गेले आणि काही क्षणांनंतर नर्सिंग स्टाफ गजला परवीन आणि कामील यांना गोळीबाराचा आवाज आला. परवीन जेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा तिला डॉक्टर अख्तर रक्ताच्या थारोळ्यात सापडले दिसले.

हत्येमागचा हेतू शोधण्यात येणार

“दोन मुलं हॉस्पिटलमध्ये आली, ड्रेसिंग करून घेतली आणि निघून गेली. प्रथमदर्शनी हे टार्गेट किलिंगचे प्रकरण आहे”, असं पोलीस उपायुक्त राजेश देव म्हणाले. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयाच्या स्वागत कक्ष, ड्रेसिंग रूम आणि गॅलरीमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तपास चालू आहे, हत्येमागील हेतू निश्चित करण्यासाठी अनेक कारणांचा शोध घेतला जात आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हत्येमागची नेमकी पार्श्वभूमी काय? कोणाच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली, याबाबत तपास केला जात आहे.