बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपाचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांचे सख्खे भाऊ शंभू शर्मा आणि गौतम शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील पत्रकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.

एक होता पत्रकार तर दुसरा होता सीए

या घटनेबाबत पाटणाचे एसएसपी मानवगीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, दोन्ही भाऊ दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करणाऱ्या गुन्हेगारांनी पत्रकार चौकात त्यांना ओव्हरटेक केले आणि दोघांवर गोळ्या झाडल्या. चित्तरंजन शर्मा हे धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीमा गावचे रहिवासी आहेत. गोळीबार झालेल्या दोघांपैकी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि दुसरा वेब पोर्टलवर पत्रकार म्हणून काम करत होता.


एप्रिलमध्ये काका आणि भावाची हत्या झाली होती
या वर्षी एप्रिल महिन्यातही चित्तरंजन शर्मा यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आणि आज पुन्हा दोन भावांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमागे जुने वैमनस्य असल्याचे सांगितले जात असून यासाठी नीमा गावातील पांडव सेनेचे प्रमुख संजय सिंह यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या हत्येचा आरोपही संजय सिंगवर होता. चित्तरंजन शर्मा आणि संजय सिंह यांच्यात जुने वैर आहे.


याआधीही दोन्ही बाजूंनी झाले आहेत अनेक खून
नीमा गावात दोन गटांमध्ये तणाव आहे. यापूर्वीही दोन्ही बाजूंनी अनेक हत्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप लेखी अर्ज न दिल्याने या घटनेत नीमा गावातील पांडव टोळीचा हात आहे की नाही हे सांगणे योग्य नाही. लेखी अर्ज दिल्यानंतरच काही सांगता येईल असे पोलिसांना म्हणले आहे.

Story img Loader