जम्मू-काश्मीरमध्ये अवंतीपुरा या भारतीय हवाई दलाच्या हवाईतळ क्षेत्राबाहेर अतिरेक्यांनी वाहनावर केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान धारातीर्थी पडले, तर इतर चार जण जखमी झाले.
सीमा सुरक्षा दलाचे जवान येथून ३३ कि.मी अंतरावर असलेल्या पुलवामा येथे जात असताना दुपारी अतिरेक्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना तेथे भारतीय हवाई दलाच्या हवाई तळाचे संरक्षण करण्यासाठी तैनात केले होते. सीमा सुरक्षा दलांच्या १६५ व्या ‘जी’ कंपनीवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याने त्यात दोन जवान धारातीर्थी पडले. सीमा सुरक्षा दलाचे जवान लष्कराच्या जिप्सी गाडीमध्ये होते, या गाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला.
त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीमा सुरक्षा दलांनी अतिरेक्यांवर गोळीबार केला असता ते पळून गेले. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स व सीमा सुरक्षा दल यांची कुमक मागवण्यात आली. जखमींना लष्करी तळावरील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस प्रवक्तयाने सांगितले की, कुईल येथे सीमा सुरक्षा दलाच्या वाहनावर गोळीबार झाला. सहायक उपनिरीक्षक आर.यादव व हेड कॉन्स्टेबल एस. यादव हे जखमी झाले होते, परंतु नंतर त्यांचा मृत्यू झाला.
हेड कॉन्स्टेबल जय प्रसाद व कॉन्स्टेबल अमर बहादूर व पी.सिंग व विनोद कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिरेकी नंतर आजूबाजूच्या फळबागांमध्ये पळून गेले. कुठल्याही अतिरेकी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. ११ ऑगस्टनंतरचा हा सीमा सुरक्षा दलांवरचा दुसरा तर सुरक्षा दलांवरचा चौथा हल्ला आहे.
आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये पाच सुरक्षा जवानांसह सहा जण मृत्युमुखी पडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ११ ऑगस्टला पांपोरे येथे हल्ल्यात आठ सुरक्षा जवान जखमी झाले, त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचा एक कॉन्स्टेबल दुसऱ्या दिवशी एका हल्ल्यात धारातीर्थी पडला; गुरूवारी पांपोरेतील गलेंदर येथे अतिरेक्यांच्या पोलिस वाहनावर हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा