पाकिस्तानमधील लाहोर येथे असलेल्या तुरुंगात सरबजित सिंग याचा खून केल्याच्या प्रकरणी दोन कैद्यांवर आरोप दाखल करण्यात आले असून या दोघा कैद्यांना त्याआधीच मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. भारतीय कैदी सरबजित सिंग याच्या सुटकेची मागणी त्याच्या नातेवाईकांनी व आपल्या देशाने केली असताना पाकिस्तानने त्याची सुटका केली नव्हती. त्यातच काही कैद्यांनी तुरुंगातील धारदार साधनांनी डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले त्यानंतर त्याचे रुग्णालयात निधन झाले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सय्यज अंजुम रझा सय्यद यांनी या प्रकरणी कोट लखपत तुरुंगात सुनावणी केली व अमर सरफराझ ऊर्फ तांबा व मुद्दसर बशीर या दोघांवर आरोप ठेवले होते. सुनावणीच्या वेळी दोघांनाही आरोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या व पुढील सुनावणी २० जानेवारीला ठेवण्यात आली आहे. फिर्यादी पक्षाने साक्षीदार उभे करावेत असेही सांगण्यात आले. या दोघा आरोपींनी तुरुंगात शिक्षा भोगत असताना कोट लखपत तुरुंगात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सरबजितवर प्राणघातक हल्ला केला होता व त्यात तो गंभीर जखमी होऊन २ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. अत्यंत कडक सुरक्षेत सुनावणी झाली असे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी कोट लखपत पोलिसांनी चौकशी पूर्ण केली असून पोलीस भारतीय व पाकिस्तानी कैद्यांना साक्षीदार म्हणून हजर करणार आहे व त्यावेळी त्यांचे जबाब नोंदवले जातील. अमीर व मुद्दा यांनी यापूर्वी एक सदस्यीय न्यायिक आयोगासमोर गुन्ह्य़ाची कबुली दिली होती. त्यांनी चौकशीकर्त्यांना असे सांगितले होते की, आम्ही सरबजितवर प्राणघातक हल्ला केला होता कारण लाहोर येथील बॉम्बस्फोटाच्या प्रकरणास तो जबाबदार होता. सरबजित याला १९९० मध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बहल्ल्यांच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा