गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे देशातील असहिष्णुता वाढत असल्याची टीका होत असतानाच मंगळवारी हरियाणातील गावात जातीय वादातून दलित कुटुंबावर हल्ल्याची घटना घडली. येथील सुनपेड गावात उच्चवर्णीय जमावाकडून दलित कुटुंबाचे घर जाळण्यात आले. यामध्ये दलित कुटुंबातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून या मुलांचे पालक गंभीररित्या भाजले आहेत. गावातील ठाकूर समाजातील काही लोक आणि या कुटुंबात वैमनस्य होते. दरम्यान, पूर्ववैमनस्यातूनच ठाकूर समाजातील नऊ जणांच्या टोळक्याने दलित कुटुंबाचे घर जाळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हल्ला केलेले सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

दलित कुटुंबातील जितेंद्र हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी रेखा आणि वैभव व दिव्या ही लहान मुले जमावाने घर पेटवून दिले तेव्हा घरात होते. दरम्यान, या घटनेनंतर सर्वांना सफदरगंज रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी वैभव आणि दिव्या यांना मृत घोषित केले तर जितेंद्र आणि रेखा यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. जितेंद्र यांनी पोलीसांना दिलेल्या जबानीत मंगळवारी पहाटे गावातील काही लोकांनी आपल्या घरावर हल्ला केल्याचे म्हटले आहे. या सगळ्यांची नावेही त्यांनी पोलीसांना् सांगितली आहेत.
गेल्यावर्षी जितेंद्र आणि ठाकूर समाजाच्या बलवंत यांच्या कुटुंबात भांडणे झाली होती. त्यावेळी जितेंद्र यांचा भाऊ, काका आणि चुलत्यांनी बलवंत यांच्या कुटुंबातील तिघांचा खून केल्याचा आरोप आहे. या सगळ्यांना तेव्हाच अटक करण्यात आली होती आणि हे सर्वजण सध्या तुरूंगात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून प्रत्येकाला सुरक्षा देण्याचे आदेश
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, या घटनेनंतर प्रत्येकाला योग्य ती सुरक्षा पुरविण्यात यावी आणि भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले राजनाथ सिंह यांनी दिले आहेत.

Story img Loader