दोनच दिवस निवडणूक कामाची जबाबदारी

मुंबई : अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी असे दोनच दिवस निवडणुकीचे काम करावे लागणार आहेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  या कर्मचाऱ्यांना त्याआधी तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून तेही तीन ते चार तासांचेच असेल, असेही आयोगाने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यामुळे अनुदानित शाळांतील शिक्षकांनाही तासन्तास कराव्या लागणाऱ्या निवडणूक कामांतून काहीसा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक कामांबाबतच्या नोटिसा अखेरच्या क्षणाला बजावण्यात आल्याचा तसेच ही कामे ठरावीक वेळेत करण्याबाबत नियम नसल्याने तासन्तास निवडणूक कामांना जुंपले जात असल्याचा आरोप करत अनुदानित शाळांच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याची दखल घेत निवडणुकीची कामे किती तास करावी याबाबतचे काही धोरण आहे का, असा सवाल करत त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.

त्यानंतर भूमिका स्पष्ट करताना अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशीच निवडणुकीची कामे करावी लागतील, असे निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड्. प्रदीप राजागोपाल आणि दृष्टी शाह यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या आधी तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचा कालावधीही तीन ते चार तासांचाच असेल, असेही आयोगाने सांगितले.

आयोगाची नोटीस रद्द

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी विशेषकरून शिक्षण मंडळाने २००९ साली दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना १९५०च्या ‘रिप्रेझेन्टेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट’च्या कलम २९ नुसार मतदार याद्यांची कामे अनुदानित शाळांमधील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लावता येणार नाहीत, असा निर्वाळा दिला. तसेच या कलमांतर्गत निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिसा न्यायालयाने रद्द ठरवल्या. त्याच वेळी १९५१च्या ‘रिप्रेझेन्टेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट’च्या कलम १५९ नुसार अनुदानित शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी फक्त दोन दिवस (मतदानाचा आणि त्याच्या आधीचा दिवस) आणि त्याखेरीज तीन अतिरिक्त दिवस (शक्यतो सुटीच्या दिवशी) प्रशिक्षणाचे काम करावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्याने अनुदानित शाळांचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अवघे दोन दिवसच निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.