देशात करोना लशीसाठी चक्क मारामारी सुरु असून मोठ्या प्रमाणात लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरीकांना मनस्ताप होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात परदेशी लस पर्यटनाची मागणी वाढत आहे. दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजन्सीने व्हॅक्सिन टुरिझम पॅकेज जाहीर केले आहे. पॅकेजमध्ये २४ दिवसांसाठी रशिया टूर आणि स्पुटनिक-व्ही लशीच्या दोन डोसचा समावेश आहे. दोन डोसमध्ये २१ दिवसांचा कालावधी असेल. यासाठी एकून १.३ लाख रूपये प्रतिमाणसी खर्च येणार आहे.
ट्रॅव्हल एजन्सीच्या अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार “मॉस्कोत पोहचल्यानंतर लशीचा पहिला डोस देण्यात येईल. पहिली बॅच १५ मे ला रशियासाठी रवाना झाली आहे. यामध्ये गुरुग्राममधील ३० डॉक्टरांचा सहभाग होता. तर दुसरी बॅच २९ मे ला जाणार आहे. यात दिल्लीमधील डॉक्टर्स आहेत. त्यांनी ग्रुप बुकिंग केले आहे.”
व्हॅक्सिन पॅकेजमध्ये दिल्लीवरुन हवाई प्रवासाचे तिकिट, ब्रेकफास्ट, डिनर आणि पर्यटन स्थळांच्या भ्रमंतीचा समावेश आहे. सध्या रशियाने भारतीयांना व्हॅक्सिनचा डोस घेण्यासाठी त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिली आहे.
सध्या जगामध्ये रशिया हा एकमेव देश आहे. जिथे भारतीय नागरिक लसीकरण पर्यटनासाठी जाऊ शकतात. येथे जाण्यासाठी केवळ PCR चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची अट आहे. यासाठी भारतातून रशियात गेलेल्या नागरिकांना क्वारंटाईन होण्याचीही अट घालण्यात आलेली नाही. जगात सर्वप्रथम दुबईने लसीकरण पर्यटन ही संकल्पना राबवली. मात्र आता इतर देशांप्रमाणेच दुबईत देखील भारतीयांना लसीकरण पर्यटनासाठी येण्यास मनाई करण्यात आली आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईतील एका पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने सर्वप्रथम बाहेर देशात लसीकरण पर्यटनाचे पॅकेज जाहीर केले होते. अमेरिकेत फायझरची लस उपलब्ध होताच. या कंपनीने भारतीय नागरिक अमेरिकेत जाऊन लसीकरण करून घेऊ शकतात, अशी घोषणा केली होती. यासाठी चार दिवसांचे एक पॅकेजही घोषित करण्यात आले होते. त्याची किंमत प्रतिव्यक्ती १ लाख १७ हजार इतकी ठेवण्यात आली होती.