French Tourists: अज्ञात ठिकाणी जात असताना गुगल मॅप हा जगभरातील मुशाफिरांचा वाटाड्या झालेला आहे. पण हा तांत्रिक वाटाड्या अनेकदा चुकतो. त्यावर दाखवलेला रस्ता कधी कधी भलत्याच ठिकाणी घेऊन जातो. अशी अनेक उदाहरणे आजवर घडलेली आहेत. विशेषतः भारतात जिथे बराच मोठा भाग ग्रामीण आहे. तिथे अनेक कच्चे-पक्के रस्ते असतात, जे गुगललाही कळत नाहीत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. फ्रान्समधून आलेले दोन पर्यटक नेपाळला जाताना गुगल मॅपमुळं रस्ता हरवून बसले आणि बरेलीत पोहोचले. फजिती झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना आसरा घ्यावा लागला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले.
बरेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन पर्यटक उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधील टनकपूरमधून नेपाळमधील काठमांडूच्या दिशेने निघाले होते. रात्री त्यांना बरेलीच्या बहेरीमधून शॉर्टकट असल्याचे गुगल मॅपनं दाखवलं. हा शॉर्टकट घेतल्यानंतर ते बरेलीच्या चुरैली धरणावर पोहोचले. इथे काही स्थानिकांनी त्यांना पाहिले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी ब्रायन जॅक गिल्बर्ट आणि सेबास्टियन फ्रँकोइस गॅब्रिएल या दोन पर्यटकांची भेट घेतली. ते रस्ता चुकले असल्याची माहिती त्यांना दिली. मात्र रात्र फार झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना चुरौली गावच्या सरपंचाच्या घरी थांबण्याचा सल्ला दिला.
पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन पर्यटकांना निर्जन रस्त्यावर पाहून स्थानिकांना संशय आला. काही जणांनी पर्यटकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भाषा समजत नसल्यामुळे त्यांनी चुरौली पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही पर्यटकांची सोय गावच्या सरपंचाच्या घरी केली. तसेच सकाळी त्याना काठमांडूच्या दिशेसाठी जाण्यास मार्गदर्शन केले.
गिल्बर्ट आणि गॅब्रिएल हे दोघेही भ्रमंतीसाठी ७ जानेवारी रोजी पॅरिसहून दिल्ली येथे आले होते. इथून त्यांनी सायकल प्रवासाची सुरुवात केली.