पाकिस्तानमधील उच्चभ्रू कुटुंबातील दोघांना हत्येप्रकरणी दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. अत्यंत शांतपणे आणि क्रूरतेने एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खटल्याच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शाहझेब खान (२०) आणि त्याची बहीण विवाह समारंभ आटोपून परतत असताना शाहरुखने त्यांच्यावर अत्यंत शांतपणे गोळीबार केला होता. गेल्या वर्षी २४ डिसेंबरला हा प्रकार घडला होता. या खटल्यातील एका प्रमुख संशयित व्यक्तीने शाहझेबच्या बहिणीची छेड काढली होती. त्यावरून झालेल्या भांडणात शाहझेबची हत्या झाली. शाहरुखचे वडील जमीनदार आणि बडी असामी असल्याने या खटल्याबाबत तपास यंत्रणा आणि न्यायालयावरही सर्वच स्तरांतून दबाव येत होता. तर हत्येनंतर शाहरुख दुबईला पळून गेला होता.  न्या. गुलाम मेमन यांनी शाहरुख आणि सरअज यांना मृत्युदंडाची तर साजीद आणि मुर्तझा यांना २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.