हरियाणाच्या मेवात भागात सोमवारी दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत वाहने जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नूह जिल्ह्यातील नांद गावात ही घडली आहे. नूह जिल्ह्यातील नंद गावात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एक रॅली काढली होती. या रॅलीवर एका गटाने दगडफेक केली. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. यावेळी संतप्त जमावाने रस्त्यावरील अनेक खासगी वाहनांची तोडफोड करत वाहनांना आगीच्या हवाली केलं आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी २०२३ मध्ये नासिर आणि जुनैद नावाच्या दोन तरुणाची हत्या करण्यात आली होती. या मृत्यूप्रकरणी एफआयआरमध्ये गोरक्षक मोनू मानेसरच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. हरियाणातील भिवानी जिल्ह्यात एका कारमध्ये नासिर आणि जुनैद यांचे जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते. या गुन्ह्यातील आरोपी मोनू मानेसर हा आज (सोमवार) मेवात परिसरात आल्याची माहिती समजल्यानंतर हिंसाचाराला तोंड फुटलं.

हेही वाचा- Bareilly Kanwar Yatra: बरेलीत कावड यात्रेवर दगडफेक, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मेवात भागात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शोभा यात्रा काढली होती. या यात्रेत लोकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन मोनू मानेसर याने केलं होतं. मात्र, परिसरातील लोकांनी या यात्रेला विरोध केला होता. तरीही विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी शोभा यात्रा काढली. दरम्यान, नांद गावात एका गटाने या शोभायात्रेवर दगडफेक केली. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं.

यावेळी दोन गटाने एकमेकांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दगडफेकीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी मेवातमध्ये यात्रा काढली होती. मात्र, ही यात्रा नांद गावात पोहोचताच अन्य समाजातील लोकांनी यात्रेवर दगडफेक केली. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे.या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात २ ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two group clashes in haryana stone pelting vehicles burnt viral video rmm
Show comments