२०२२ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत दोन भारतीय फॅक्ट चेकर्स असल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑल्ट न्यूज’चे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे, याबाबतचं वृत्त ‘टाइम’ने दिलं आहे. नॉर्वेचे खासदार आणि ओस्लो येथील ‘पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (पीआरआयओ) प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांना नामांकित केलं आहे.
विशेष म्हणजे नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत असणाऱ्या मोहम्मद झुबेर यांना अलीकडेच अटक करण्यात आली होती. २०१८ साली केलेल्या एका ट्वीटप्रकरणी झुबेर यांना यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या दाखल केलेल्या एफआयआरनुसार, “हे ट्वीट अत्यंत प्रक्षोभक आणि दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करणारे होते.” परंतु झुबेर यांना अटक केल्यानंतर जगभरातील अनेक लोकांनी निषेध व्यक्त केला होता. त्याचबरोबर भारतातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. झुबेर यांना एक महिना तिहार कारागृहात ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
२०२२ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत एकूण ३४३ उमेदवार आहेत. यामध्ये २५१ व्यक्ती आणि ९२ संस्था आहेत. खरं तर, नोबेल पुरस्कार समितीकडून नामांकित व्यक्तींची नावे जाहीर केली जात नाहीत. तसेच प्रसारमाध्यमांना किंवा उमेदवारांनाही याबाबतची कल्पना दिली जात नाही. परंतु ‘रॉयटर्स’कडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, बेलारूसचे विरोधी पक्षनेते स्वितलाना, ब्रॉडकास्टर डेव्हिड अॅटेनबर्ग, हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे आणि म्यानमारमधील नॅशनल यूनिटी सरकरला नॉर्वेच्या खासदारांनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं आहे.
हेही वाचा- ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांची अखेर कारागृहातून सुटका; २४ दिवसांनी तुरुंगाबाहेर
‘टाइम’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांच्या व्यतिरिक्त, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, जागतिक आरोग्य संघटना आणि व्लादिमीर पुतिन यांचे टीकाकार आणि रशियातील विरोधी पक्षनेते, अॅलेक्सी नव्हेल्नी यांनाही शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे.