कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो म्हणून सांगायचे.. कोणी गुन्हा दाखल केला तर न्यायालयीन लढाई आम्हीच लढणार.. क्रेडिट अहवालात फेरफारही करून देणार.. अशी आश्वासने देत १८० गरजू अमेरिकी नागरिकांना ठगवणाऱ्या दोन भारतीय वंशाच्या अमेरिकनांना येथील न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यात एक महिला आहे.
कॅलिफोर्नियात राहणारे बलजीत सिंग आणि शरणजीत कौर यांनी निव्वळ लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेक बनावट कंपन्यांची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी लोकांना वरील आश्वासने देत भुरळ घातली. कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने अनेक अमेरिकन नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडले. या दोघांनी त्यासाठी भारतातील एका कॉल सेंटरची मदत घेतली. कर्ज मिळवून देणे, क्रेडिट अहवालात बदल करणे वगैरेसाठी ग्राहकांकडून पैसे गोळा करायचे आणि त्यानंतर भारतातील कॉल सेंटरचा एजंटमार्फत त्यांना त्यांनी कर्ज थकवल्याचे पत्र पाठवायचे असा हा सारा मामला होता. ग्राहकांनी बलजीत आणि शरणजीत यांच्याकडे धाव घेतली तर त्यांनी हात वरती करायचे असे सर्व होते. या सर्व प्रकरणात १८० जणांची फसगत झाली.
या प्रकरणी कॅलिफोर्नियातील न्यायालयात खटला सुरू होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. गरजू लोकांच्या भावनांशी खेळण्याचाच हा सर्व प्रकार असून पैशाच्या हव्यासापोटी या दोघांनी हे कृत्य केल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. बलजीतला चार वर्षांची तर शरणजीतला तीन वर्षांची सजा सुनावण्यात आली.