‘इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया'(आयएसआयएस) आणि ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी भारतातून पसार झालेले दोघे जण भारतीय तरुणांची माथी भडकवत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दहशतवादी यासीन भटकळचे मूळ जन्मठिकाण असलेले कर्नाटकमधील भटकळ या गावाचेच नाव पुढे आले आहे.
अब्दुल कादिर सुलतान अरमार(३८) हा मूळचा भटकळ वासीय तरुण सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभागात वास्तव्यास असून अंसारूल तौदीदुल हिंद या दहशतवादी संघटनेशी तो जोडलेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील तरुणांना आमिष दाखवून ‘आयएसआयएस’ व ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती करायची, अशी जबाबदारी सध्या अरमार सांभाळत असल्याचेही समजते. धक्कादायकबाब म्हणजे, जयपूर आणि हैदराबादमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत भारतीय तरुणांची भरती करण्यासाठी अरमारकडून प्रयत्न केले गेले असल्याचेही तपास यंत्रणांनी सांगितले आहे. याशिवाय कर्नाटकमधीलच आणखी एक सीमीचा कार्यकर्ता अरमारला मदत करत असून हा तरुण सध्या आखाती देशांमध्ये वास्तव्याला असल्याचे कळते. हैदराबादमधील चार युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी या साथीदारानेच प्रयत्न केले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
अरमार हा भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असून भारताची सर्वोच्च तपास संस्था असलेल्या ‘एनआयए’ने अरमार व ‘आयएसआयएस’च्या कटाबाबत माहिती दिल्यानंतर इंटरपोलने देखील त्याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटिस जारी केलेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा