गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. आता येथील हिंसाचाराने क्रूरतेचा कळस गाठला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीतर संबंधित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम’ (ITLF) ने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली. याबाबत कांगपोकपी येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सिंह यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितलं की, या घटनेबाबत महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. यावेळी मी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्मृती इराणी म्हणाल्या, “मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना निषेधार्ह आणि अत्यंत अमानवीय आहे. याबाबत मी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्याशी बोलले आहे. त्यांनी मला सांगितलं की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोषींवर कारवाई करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.”
ITLF ने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, या अत्याचाराच्या घटनेच्या एक दिवस आधी अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीवरून मेईतेई आणि कुकी समुदायामध्ये जातीय संघर्ष झाला. यानंतर ४ मे रोजी घडलेल्या घृणास्पद घटनेत काही पुरुष असहाय्य महिलांवर अत्याचार करताना दिसले. बुधवारी (१९ जुलै) मणिपूर पोलिसांनी एका ट्विटमध्ये सांगितलं की, त्यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘एनडीटीव्ही’ला सांगितलं की, आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांना लवकरच अटक करू. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी पीडित कुटुंब पोलिसांकडे आलं होतं. पण पुढील एक-दोन दिवसांत आम्ही त्या आरोपींना पकडू.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून घटनेचा निषेध केला आहे. तसेच मणिपूरमधील हिंसाचाराकडे केंद्र सरकार आणि पंतप्रधान कानाडोळा का करत आहेत? असा सवालही त्यांनी विचारला. प्रियंका गांधी ट्विटमध्ये म्हणाल्या, “मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या या भीषण घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. समाजात घडणाऱ्या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिला आणि लहान मुलांना बसतो. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत हिंसाचाराचा निषेध केला पाहिजे. मणिपूरमध्ये घडणाऱ्या अशा हिंसक घटनांकडे केंद्र सरकार आणि पंतप्रधान कानाडोळा का करत आहेत? अशा हिंसक घटनांमुळे त्यांचं मन अस्वस्थ होत नाही का?”