काश्मीरच्या दक्षिणेकडील पुलवामा जिल्ह्यात बुधवारी भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याठिकाणच्या नैना गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याने या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. ठार मारण्यात आलेल्यापैकी एकजण दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या विशेष कारवाई पथकाने या परिसराला रात्रभर गराडा घातला होता. त्यानंतर आज सकाळी गोळीबाराला सुरूवात झाली, त्यामध्ये हे दोन दहशतवादी मारले गेले. दरम्यान, सैन्याची शोध मोहिम अजूनही सुरू असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून दिली आहे.

Story img Loader