काश्मीरच्या पांपोर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली दहशतवादी चकमक अखेर संपुष्टात आली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी इमारतीत लपून बसलेल्या दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. हे अतिरेकी लष्कर-ए-तय्यबा संघटनेचे असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या चकमकीत सहाजण मरण पावले होते, यामध्ये भारतीय लष्कराच्या एका कॅप्टनसह दोन सैनिकांचा समावेश आहे.
अतिरेक्यांनी शनिवारी दुपारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका ताफ्यावर गोळीबार केला व नंतर त्यांनी उद्योजकता विकास संस्थेच्या (ईडीआय) इमारतीत आश्रय घेतला. या इमारतीतील संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी मिळून सुमारे १०० नागरिकांना सुरक्षा दलांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.
रविवारी पहाटे सुरक्षा दलांनी या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला असता अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात हरयाणाच्या जिंद भागातील कॅप्टन पवन कुमार हा तरुण अधिकारी जबर जखमी होऊन नंतर मरण पावला. इमारतीत अडकलेले अतिरेकी व सुरक्षा दलांचे जवान यांनी एकमेकांवर गोळीबाराच्या फैरी झाडल्या असता पॅरा युनिटचा सैनिक ओमप्रकाश हा जखमी झाला आणि बदामीबाग कँटॉनमेंटमधील लष्करी इस्पितळात उपचार घेत असताना मरण पावला.
शनिवारी अतिरेक्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान व एक नागरिक मरण पावले, तर इतर ९ जवान जखमी झाले होते.अतिरेकी ज्या इमारतीत लपून बसले आहेत, ती बऱ्याच प्रमाणात खुली असल्यामुळे त्या दिशेने जाणे सुरक्षा दलांना कठीण होते आहे. अतिरेक्यांजवळ भरपूर शस्त्रे असल्याचे दिसते, त्यामुळे ही मोहीम आणखी लांबू शकते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2016 रोजी प्रकाशित
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी चकमक संपुष्टात, दोन अतिरेक्यांना कंठस्नान
हे अतिरेकी लष्कर-ए-तय्यबा संघटनेचे असल्याची शक्यता आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-02-2016 at 17:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two militants killed in pampore encounter says army