बिहारच्या बेगुसराय जिल्ह्य़ातील धक्कादायक घटना

शाळेच्या गणवेशाचे पैसे दिले नाहीत म्हणून शिक्षिकेने दोन बहिणींच्या अंगावरचे कपडे काढल्याची घटना बिहारच्या बेगुसराय जिल्ह्य़ातील एका शाळेत घडली. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेसह शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना मुफासिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरिया खेडय़ातील बी.आर. एज्युकेशन अ‍ॅकॅडमीत गुरुवारी घडली. गेल्या एप्रिल महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू झाले त्या वेळी पहिलीत व नर्सरीत शिकणाऱ्या या बहिणींना शाळेने गणवेशाचे दोन जोड दिले होते. गणवेशाच्या किमतीपोटी त्यांना १६०० रुपये द्यायचे होते, मात्र या दोघींचे वडील ते देऊ शकले नाहीत. गुरुवारी या दोघी शाळेत आल्या, त्या वेळी वर्गशिक्षिका अंजना देवी यांनी अनुक्रमे साडेसहा व ५ वर्षे वयाच्या या मुलींच्या अंगावरचे कपडे उतरवले आणि त्यांना अंतर्वस्त्रात घरी पाठवले, असा आरोप आहे. या मुलींचे वडील चुनचुन कुमार साव हे लहानसे किराण्याचे दुकान चालवतात. मुलींच्या वर्गमैत्रिणींनी त्यांची थट्टा उडवल्यामुळे या घटनेने त्या दुखावल्या आहेत, असे साव म्हणाले. ही गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार असल्यामुळे आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना शाळेत पाठवले. काही विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशी यांच्याशी बोलल्यानंतर, असा प्रकार घडल्याची त्यांची खात्री पटली, असे बेगुसरायचे पोलीस अधीक्षक रणजित कुमार मिश्रा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

 

Story img Loader