आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्याच्या कारणामुळे विरोधकांकडून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर टीका होत असतानाच, आता राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यादेखील वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत. ललित मोदी यांच्या पत्नीवर पोर्तुगालमधील चॅम्पालिमॉड फाऊंडेशनच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर दोनच महिन्यात राजस्थान सरकारने याच फाऊंडेशनबरोबर सामंजस्य करार केला. कर्करोगावरील उपचारांसाठी जयपूरमध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यासाठी २ ऑक्टोबर २०१४ रोजी हा करार करण्यात आला. मोदी यांची पत्नी मीनल यांच्यावरील उपचारानंतर लगेचच राजस्थान सरकारने याच रुग्णालयाबरोबर करार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यासदंर्भात राजस्थानचे आरोग्य मंत्री राजेंद्र सिंग राठोड म्हणाले, ललित मोदी आणि या कराराचा काही संबंध आहे का, हे मी सांगू शकणार नाही. आम्ही ज्या रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार केला, तिथेच ललित मोदी यांच्या पत्नीवर उपचार करण्यात आले आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती.
दरम्यान, ललित मोदी यांनी मात्र एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत २०१२-१३ मध्ये वसुंधरा राजे याचा माझ्या पत्नीला पोर्तुगालमधील चॅम्पालिमॉड फाऊंडेशनच्या रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या, असे म्हटले आहे. ललित मोदी यांच्या या खुलाशामुळे वसुंधरा राजे यांच्यापुढील अडचणी वाढणार असल्याचे दिसते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा