Bangladesh Protest For Hindu : बांगलादेशमध्ये हिंदूंसह इतर अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे इस्कॉनचे माजी सदस्य व तिथल्या हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आंदोलन करणारे हिंदू संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांना बांगलादेशी सरकारने तुरुंगात डांबलं आहे. पाठोपाठ आता तिथल्या आणखी दोन संन्याशांना अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. इस्कॉन कोलकाताचे प्रवक्ते राधारमण दास यांनी शनिवारी (३० नोव्हेंबर) म्हटलं की “बांगलादेशमध्ये आणखी दोन हिंदू संन्याशांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही हिंदू संन्यासी इस्कॉनशी संबंधित आहेत”. राधारमण पीटीआयशी बोलत होते. त्यांनी शुक्रवारी एक्सवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की “आम्हाला नुकतीच एक वाईट बातमी मिळाली आहे. चिन्मय प्रभू यांच्यासाठी प्रसाद घेऊन गेलेले दोन संन्यासी प्रसाद देऊन मंदिरात परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर चिन्मय प्रभू यांचे सचिव देखील बेपत्ता आहेत. कृपया त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी”.
याआधी देखील राधारमण यांनी एक पोस्ट केली होती की “आमचे आणखी एक संन्यासी श्री श्याम दास प्रभू यांना चटोग्राम पोलिसांनी अटक केली आहे”. त्यांनी एक्सवर म्हटलं होतं की “श्याम दास प्रभू दहशतवादी आहेत का? त्यांनी काय केलंय? बांगलादेश सरकारने इस्कॉनच्या निर्दोष संन्याशांना तुरुंगातून मुक्त करावं. इस्कॉनमधील संन्याशांना झालेल्या अटकेचं वृत्त पाहून आम्हाला मोठा धक्का बसला आहे”.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पदच्युत झाल्यापासून देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होऊ लागले आहेत. ढाक्याच्या उत्तरेस सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपूर शहरात हिंदू समुदायाच्या नेतृत्वाखाली मजबूत कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांकांना समर्पित मंत्रालयाच्या मागणीसाठी निदर्शने सुरू होती. त्या अंतर्गत चिन्मय दास यांना अटक करण्यात आली आहेे.
बांगलादेशमधील हिंदूंसाठी RSS मैदानात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी (३० नोव्हेंबर) एक निवदेन जारी केलं आहे. संघाने बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांनी या निवेदनात म्हटलं आहे की “बांगलादेशात हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मुस्लीम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हल्ले, हत्या, लूटमार, दरोडे, जाळपोळीच्या घटना, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायातील मुलं व महिलांवरील अमानवीय अत्याचार खूप चिंताजनक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या घटनांचा निषेध नोंदवतो. बांगलादेशमधील सध्याचं सरकार व इतर संरक्षण यंत्रणा, पोलीस व सैन्य या सगळ्या घटनांकडे कानाडोळा करत आहेत. संरक्षण यंत्रणा तिथल्या अलप्संख्याकांना वाचवण्याऐवजी मूकदर्शक बनल्या आहेत. त्याच वेळी बांगलादेशमधील हिंदूंनी त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारांनंतर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथल्या सरकारने त्यांचा आवाज दाबून ठेवला आहे. तिथल्या हिंदूंनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र बांगलादेशी सरकारने हिंदूंची आंदोलनं चिरडली. प्रसंगी त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे”.