संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मागील चार दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सदनात आक्षेपार्ह वर्तन केल्याचा ठपका ठेवत संबंधित खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन केलं जात असल्याने विरोधी पक्षांनी सदनाबाहेर आंदोलन केलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना आज (२० डिसेंबर) आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.
सी थॉमस आणि एएम अरिफ असं निलंबित करण्यात आलेल्या लोकसभेच्या दोन खासदारांची नावं आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान फलक घेऊन अध्यक्षांच्या खुर्चीसमोरील जागेत प्रवेश केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या दोन खासदारांच्या निलंबनानंतर एकूण निलंबित खासदारांचा आकडा १४३ वर गेला आहे.
१३ डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभा सदनात प्रवेश केला होता. प्रेक्षकांच्या बाल्कनीत उडी घेत तरुणांनी लोकसभा सभागृहात धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेनंतर विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली होती. यावेळी खासदारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. यामुळे आतापर्यंत १४३ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.