गुजरातमधील इशरत जहाँ हत्याकांडप्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना शनिवारी केंद्रीय गुप्तचर विभागाने अटक केली. २००४ मध्ये एका बनावट चकमकीत इशरत आणि अन्य तीनजण मारले गेले होते. ही चकमक घडविणाऱ्या पोलीस पथकात हे दोघेजण होते.
जे. जी. परमार आणि तरुण बारोट अशी या दोघांची नावे आहेत. परमार हे पोलीस उपअधीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना शुक्रवारी रात्री अटक झाली. बारोट हे सध्या मेहसाणाचे पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यांना शनिवारी दुपारी अटक झाली. हे दोघे इशरत जहाँ हत्याकांडाच्या वेळी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या अटकेमुळे इशरत जहाँ हत्यारकांडप्रकरणी अटक झालेल्या पोलिसांची संख्या तीनवर गेली आहे.
हे दोघे पोलीस सध्या इशरतच्याच धर्तीच्या सादिक जमाल बनावट चकमक व हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयच्या तपास पथकाने या चकमकीवरून गुरुवारी पोलीस अधीक्षक गिरिश सिंघल यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर या दोघांना ही अटक झाली आहे.
महाराष्ट्रातील मुंब्रा येथील इशरत ही प्रणेश पिल्लै ऊर्फ जावेद शेख, झीशान जोहर आणि अमजद अली राणा या तिघांसह गाडीने जात असताना अहमदाबाद आणि गांधीनगरदरम्यान निर्मनुष्य रस्त्यावर १५ जून २००४ रोजी पोलीस पथकाने गोळीबारात या चौघांची हत्या केली होती. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कामगिरीवर हे चौघेजण निघाले होते, असा दावा पोलिसांनी तेव्हा केला होता.  परमार यांना १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची सीबीआयची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा