Death by chhole in Noida: नोएडाच्या सेक्टर ७० मधील एका गावात विचित्र घटना घडली आहे. येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या दोन युवकांचा घरातच श्वास गुदमरल्यामुळं मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी घरातून धूर येत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात बेशूद्ध अवस्थेत पडलेल्या दोन तरुणांना बाहेर काढलं. दोघांनाही सेक्टर ३९ मधील नोएडा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत मोफत वाचा

पोलिसांनी दोन्ही तरुणांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पाठवला आहे. उपेंद्र (२२) आणि शिवम (२३) अशी मृत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नोएडामध्ये छोले-कुलचे आणि भटुरे विक्रीचा स्टॉल लावत होते. येथेच ते एका भाड्याच्या घरात हे पदार्थ बनविण्याचे काम करायचे.

हे वाचा >> संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

श्वास कसा कोंडला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी रात्री गॅसवर पातेल्यात छोले शिजविण्यासाठी ठेवले होते. मात्र त्यानंतर त्यांना झोप लागली. रात्रभर गॅस सुरू राहिल्यामुळं छोले पातेल्यातच जळाले आणि त्यातून घरात धूर पसरला. सकाळी शेजाऱ्यांना घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. पोलिसांच्या मदतीने तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितले की, घराच्या खिडक्या, दरवाजे बंद असल्यामुळे धूर बाहेर पडला नाही. त्यातच घरात ऑक्सिजनची कमतरता आणि कार्बन मोनोऑक्साइडची मात्रा वाढल्यामुळे तरुणांचा श्वास कोंडला. तरुणांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. मात्र तरीही मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two noida men in noida suffocate to death after chhole left on stove fills room with smoke kvg