ओडिशात पायलिन वादळानंतर आता अनेक ठिकाणी पूर आला असून किमान अडीच लाख लोक अडकून पडले आहेत. मदतकार्य व त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान राज्य सरकारने तैनात केले आहेत. बालासोर जिल्ह्य़ात पुराचा मोठा फटका बसला आहे. लष्कर, नौदल व हवाई दल यांचीही अन्नाची पाकिटे टाकण्यासाठी मदत घेतली जात आहे, असे राज्याचे महसूल व आपत्ती व्यवस्थापन मंत्री एस.एन.पात्रो यांनी सांगितले.  
सोमवारच्या पायलिन वादळाने ओडिशात एकूण २५ जण मरण पावले असून राज्यात आणखी काही ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मयूरभंज व भद्रक जिल्ह्य़ात जोरदार पावसाने २१ जण मरण पावले. अनेकांचे मृत्यू हे भिंती कोसळणे, झाडे कोसळून झाले आहेत. हळूहळू राज्यातील स्थिती पूर्वपदावर येत असून मुख्यमंत्री नवीन पटनायक हे गोपाळपूर व गंजम जिल्ह्य़ाचा हवाई दौरा करणार आहेत.
दरम्यान, पायलिन चक्रीवादळ आता कमकुवत झाले असून गेल्या सहा तासात त्याचा वेग ताशी २० कि.मी. इतका कमी झाला आहे.   ओडिशात येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.किनारी प्रदेशात ताशी ५५ ते ६५ कि.मी. वेगाने वारे वाहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्नाच्या पाकिटांची मदत
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले की, १४ दिवस पुरेल एवढे अन्न असलेली पाकिटे जास्त फटका बसलेल्या खेडय़ात दिली जातील. जास्त फटका बसलेल्या गावातील लोकांना ५० किलो तांदूळ व डाळ खरेदीसाठी ४०० रूपये दिले जातील. कमी फटका बसलेल्या गावात २५ किलो तांदूळ व डाळीसाठी २०० रूपये रोख दिले जातील. मासेमारीसाठी जाऊ न शकलेल्या मच्छीमारांना प्रत्येकी १० किलो तांदूळ दिला जाईल. सरकारी अंदाजानुसार १,०२,६५,८७२ लोकांना वादळाचा फटका बसला आहे.  बेहरामपूर येथे सर्वात जास्त फटका बसला असून तेथे दोन जण मरण पावले.
काँग्रेसचा आरोप
ओडिशातील बिजू जनता दल सरकारला वादळामुळे निर्माण झालेली स्थिती हाताळता आली नाही, उलट केंद्र सरकारने संरक्षण कर्मचारी व त्यांची मदत यंत्रणा पाठवून चांगली मदत केली, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयदेव जेना व केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना यांनी सांगितले. किनारी भागातील पाणी व वीज पुरवठा अद्याप सुरळीत झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. पायलिन वादळामुळे वस्तूंची साठेबाजी झाली असून भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठी दरवाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
पायलिन वादळामुळे पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर मालवाहू जहाज बुडाले. त्यातील १७ चिनी व एका इंडोनेशियन व्यक्तीला वाचवण्यात तटरक्षक दलास यश आले.
मदतकार्याची प्रशंसा
लष्करी दले, वैज्ञानिक व इतर  सरकारी संस्थांनी या वादळाला समर्थपणे तोंड देऊन एक आदर्श घालून दिला आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितले,की आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती मदत प्रतिसाद दल व हवामान खाते व वैज्ञानिकांनी चांगली कामगिरी केली आहे.
आंध्र प्रदेशात श्रीकाकुलम पूर्वपदावर येत आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ गौर यांनी सांगितले. रस्ते अडथळेमुक्त केले असून मदत पथके काम करीत आहेत असे ते म्हणाले.  ओडिशा व आंध्र प्रदेशात एनटीपीसीच्या प्रकल्पांवर परिणाम झाला नाही.
दरम्यान, पूर्व किनारी रेल्वेची सेवा सुरू झाली आहे, रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two odisha districts hit by floods after phailin 2 5 lakh marooned
Show comments