काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबारेषेवर लष्कराने रविवारी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेवर अतिरेकी घुसल्याची चाहुल लागताच केरण भागातील जुमागुंड येथे जवानांनी आव्हान दिले, त्यानंतर परस्परांवर गोळीबार करण्यात आला. त्यात दोन अतिरेकी मारले गेले.
तंगधर भागातही चकमक झाल्याचे वृत्त आहे, या वेळी शोधमोहिमेत लष्कराच्या अधिकाऱ्याने प्राण गमावले. रात्री प्रत्यक्ष ताबारेषेवर तंगधर क्षेत्रात रागणी छावणीजवळ सुरक्षा दले व घुसखोर अतिरेकी यांच्यात ताया जंगलात चकमक झाली, त्यात एक लष्करी अधिकारी धारातीर्थी पडला व इतर दोन जण जखमी झाले. कुपवाडा जिल्ह्य़ात ही घटना घडली. उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्य़ातील गुरेझ क्षेत्रात एक लष्करी अधिकारी पाय घसरून दरीत कोसळल्याने मरण पावला.
३६ आरआर युनिटचे कॅप्टन प्रेमकुमार कृष्णा पाटील हे जंगलात अतिरेक्यांचा शोध घेत असताना दरीत कोसळले. अतिरेक्यांच्या संशयास्पद हालचाली चालू असताना लष्कराने शोधमोहीम चालवली होती. एका जखमी अधिकाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाटील यांचा जखमी अवस्थेत मृत्यू झाला. पाकिस्तानमधून घुसखोरीचे प्रमाण वाढले असून पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात दहशतवादी घुसण्याची ही तिसरी वेळ आहे. नुकतेच मोहम्मद नावेल या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले.

Story img Loader