Durg News : सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच. मात्र, अनेकांना मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलेलं असतं. अनेक तरुण मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना त्यांना कोणत्याही गोष्टीचं भान राहिलेलं नसतं. हेच मोबाईलवर गेम खेळण्याचं व्यसन अनेकदा त्यांच्या जीवावरही बेततं. अशा अनेकदा घटनाही समोर आलेल्या आहेत. आता अशीच एक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे.
दोन तरुणांना ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात आयुष्याला मुकावं लागलं आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुण रेल्वे रुळावर बसून मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. पूरण साहू आणि वीर सिंग अशी मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. हे दोन तरुण रेल्वे रुळापासून दुसरीकडे थांबले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात दोन तरुण रेल्वे रुळावर बसून मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळत होते. गेम खेळत असताना ते दोघेही इतके मग्न झाले होते की त्या दोघांनाही समोरून लोकल ट्रेन आलेलं कळलं नाही. इतकंच काय तर लोकल ट्रेनचा हॉर्नही ऐकू आला नाही. यामुळे या दोघांनाही ट्रेनची धडक बसली आणि त्या दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पद्मनाभपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसाली भागात दोन्ही १४ वर्षांची मुले रेल्वे रुळावर बसून मोबाईलवर गेम खेळत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांना माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरु असल्याची माहिती सागण्यात येत आहे.
खरं तर रेल्वे विभागाकडून अनेकवेळा रेल्वे फाटक आणि रेल्वे रुळांजवळील लोकांना इशारा देत तशा पद्धतीचे फलक देखील लावलेले असतात. लोकांना रेल्वे रुळांजवळ न जाण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या असतात. मात्र, असं असूनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. अशीच घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील घडल्याचं पाहायला मिळत आहे.