गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असून, त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण खाते सोपविण्यात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्रिकर केंद्रीय मंत्रिमंडळात गेले तर गोव्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची, यावर भाजपच्या अंतर्गत वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
त्यादृष्टीने भाजपच्या गोव्यातील कार्यकारिणीची बैठक गुरुवारी बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड करायची, याचा निर्णय घेण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. ही बैठक पणजीमध्ये कुठे होणार, याची माहिती भाजपने अधिकृतपणे दिलेली नाही. गोव्यातील सध्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र अर्लेकर यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्सेकर आणि अर्लेकर हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत.
पर्रिकर यांच्यासह गोव्याचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सतीश धोंड सध्या दिल्लीत असून, या बैठकीसाठी ते पणजीला येणार आहेत. पर्रिकर यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपण केवळ गोव्यातील विषयांवर चर्चा केल्याचे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळात पर्रिकर यांना स्थान देण्यात येणार असून, त्यावरच या दोघांमध्ये चर्चा झाली. येत्या रविवारी किंवा सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, त्यावेळी पर्रिकर यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्याचे समजते.

Story img Loader