नवी दिल्ली : नैर्ऋत्य दिल्लीतील आरके पूरम भागात रविवारी सकाळी दोन बहिणींची हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर काही तासांतच मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दोन महिलांच्या भावाने पहाटे चार वाजून ४० मिनिटांनी आंबेडकर वस्तीत आपल्या बहिणींवर हल्लेखोरांनी गोळय़ा झाडल्याची माहिती पोलिसांना दूरध्वनीवरून दिली.
पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोन महिलांना गोळी लागल्याचे त्यांनी पाहिले. या जखमी महिलांना तातडीने एस. जे. रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलांचे नाव पिंकी (३०) आणि ज्योती (२९) आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार या हल्लेखोरांचा या महिलांच्या भावाशी आर्थिक व्यवहारावरून वाद होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.