उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत. सीमा सुरक्षा दलाचे शंकर शिंदे आणि सहदेव मोरे अशी धारातीर्थी पडलेल्या या जवानांची नावे आहेत. यामधील शंकर शिंदे हे नाशिकच्या चांदवडमधील आणि सहदेव मोरे हे विजापूरचे सुपूत्र होते.  या चकमकीत एका अधिका-यासह चार जवानही जखमी झाले . दरम्यान, भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील मरसारी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले. या गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये एक लष्करी अधिकारीही आहे. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चकमक बराच वेळ चालू असल्याने जवानांनी दहशतवाद्यांनी कब्जा केलेले घर स्फोटकाच्या साहाय्याने उडवून दिले. यात चारही दहशतवादी ठार झाले आहेत. मरसारी गावात दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर राष्ट्रीय रायफल्स, विशेष कृती दल, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाई केली.

Story img Loader