Sons Killed Mothers Lover : गांधीनगरमधील मोखासन गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन भावांनी एका व्यक्तीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपी भावांनी आधी पीडिताला चाकूने भोसकून ठार केले आणि त्यानंतर त्याचे आतहेडी हवेत फेकले. त्यावेळी घटनास्थळी असलेल्या अनेकांना यामुळे धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या आईचे पीडित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांचा दिर्घकाळापासून पीडितावर राग होता आणि त्यातून ही हत्या झाली आहे.
प्रेमसंबंधामुळे दिवंगत वडिलांच्या…
कलोल तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संजय ठाकोर (२७) आणि जयेश ठाकोर (२३) यांना ४५ वर्षीय रतनजी ठाकोर यांच्याबाबत राग होता. कारण त्यांच्या आईचे पीडित व्यक्तीचे १५ वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेमसंबंधामुळे दिवंगत वडिलांच्या स्मृतीचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबाची नाचक्की झाल्याने या भावांनी पीडिताची हत्या केल्याचे म्हटले आहे.
जातपंचायतीची मध्यस्थी अयशस्वी
एफआयआरनुसार, संजय आणि जयेश ठाकोर यांचे रतनजी ठाकोर यांच्याशी यापूर्वीही वाद झाले होते. “आरोपींनी पीडिताला वारंवार त्यांच्या आईपासून दूर राहण्याची सांगूनही ते ऐकत नव्हते. नंतर त्यांनी समाजातील वरिष्ठांनाही या प्रकरणात सहभागी करून घेत हा प्रश्न शांततेने सोडवण्याचे प्रयत्न केले होते, पण ते अयशस्वी ठरले,” असे तपास अधिकारी उन्नती पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.
रक्ताने माखलेला चाकू दाखवत…
हत्येच्या दिवशी, पीडित रतनजी आणि त्यांचा सहकारी जिकुजी परमार हे गावात बांधकाम करत असताना संजय आणि जयेशने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी जयेशने रतनजी यांच्या डोक्यात रॉड मारल्याने ते खाली कोसळले, त्यानंतर संजयने त्यांच्यावर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर जयेशने पीडिताचे आतडे काढून ते हवेत फेकले. ही घटना घडली त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. काही कामगार आणि पीडिताच्या मित्राने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी भावांनी त्यांना रक्ताने माखलेला चाकू दाखवत धमकावले आणि नंतर मोटारसायकलवरून पळून गेले.
फोन लोकेशनचा माग काढत आरोपींना अटक
यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोन लोकेशनचा वापर करून त्यांचा माग काढला आणि त्याच दिवशी त्यांना अटक केली. दोन्ही भावांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.