काश्मीरमध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले. सांबा जिल्ह्य़ात जम्मू-पठाणकोट महामार्गावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला पण प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. पहाटे ५.५० वाजता त्यांनी सांबा क्षेत्रात मेशवारा येथील लष्करी छावणीवर हातबॉम्ब फेकले, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले की, लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यावेळी एक सायकलवाला रस्त्याने जात होता तो गोळीबारामुळे खाली पडून जखमी झाला असे लष्कराने सांगितले.
संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले की,  मारले गेलेले दोन दहशतवादी कथुआ क्षेत्रात शुक्रवारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या गटातील होते की नाही हे समजू शकले नाही. सकाळी पावणेसहाच्या सुमारास अतिरेक्यांनी गोळीबार केला व त्यात कुणीही जखमी झाले नाही. एकही नागरिक किंवा सैनिक जखमी झाला नाही फक्त एक नागरिक सायकलवरून जात असताना गोळीबारामुळे खाली पडून जखमी झाला पण त्याला गोळी लागलेली नाही. हे दहशतवादी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करीत नव्हते. त्यांनी बाहेरून गोळीबार केला व लष्कराने या भागाला सुरक्षा कडे केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-पठाणकोट महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.
काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी सांगितले की, पहाटे साडेपाच वाजता पहिल्यांदा गोळीबाराचा आवाज आला. त्यात एक जण जखमी झाला असून शुक्रवारच्या हल्ल्यानंतर राज्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सांबा येथे मोठा हल्ला दहशतवादी करू शकले नाहीत.
जम्मूत दुसरा दहशतवादी हल्ला लागोपाठ झाला आहे. कथुआ येथे शुक्रवारी आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वाई येथील जवानासह तीन जवान हुतात्मा झाले होते तर दोन नागरिकही मारले गेले होते, यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. अकरा जखमींमध्ये पोलीस उपमहानिरीक्षकांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा