जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे, याबाबतची माहिती काश्मीर पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी रात्री पुलवामा येथील गुंडीपोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसराला घेराव घातला होता. शोध मोहीम सुरू असताना अचानक चकमक सुरू झाली.
रात्रभर झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. त्यानंतर काही वेळात अन्य एका दहशतवाद्याला मारल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी सकाळी दिली आहे. सुरक्षा दलाने दोन एके बंदुका जप्त केल्या आहेत. पुढील शोधमोहीम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती देताना काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी रविवारी रात्री सांगितलं की, “भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना घेरलं आहे. यामध्ये कॉन्स्टेबल रियाझ अहमदच्या मारेकऱ्याचा देखील समावेश आहे. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.” कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांची १३ मे रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
दुसरीकडे, रविवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडलं आहे. या ड्रोनला सात मॅग्नेटीक बॉम्ब आणि UBGL ग्रेनेड्स लावण्यात आले होते. पाकिस्तानी सीमेतून या ड्रोनने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करत हे ड्रोन खाली पाडलं आहे.