पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात गेल्या महिन्यात स्फोटके पेरणाऱ्या दोन छुप्या दहशतवाद्यांना (हायब्रिड मिलिटंट – एरवी सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणारे) बारामुल्ला येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दूरनियंत्रकाद्वारे संचालित अत्याधुनिक स्फोटके (आयईडी) जप्त केली. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले, की सोपोर पोलिसांनी नुकतीच केनुसा बांदीपोरा येथे पेरलेली स्फोटके नष्ट केली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
केनुसा बांदीपोरा येथील इर्शाद गनी आणि वसीम राजा या दोन छुप्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. स्फोटके व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. बांदीपोरा जिल्ह्यातील केनुसा-अस्तांगो भागात १५ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी सुमारे १८ किलो वजनाची व दोन गॅस सिलिंडरला जोडलेली स्फोटके पेरली होती.
‘अल कायदा’चा दहशतवादी अटकेत
जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’च्या एका दहशतवाद्याला हातबॉम्बसह अटक करण्यात आली. पश्चिम बंगालमधील मसिता हाओरा येथील रहिवासी असलेल्या अमीरुद्दीन खानला जम्मू-श्रीनगर महामार्गावरील रामबन येथून पोलिसांच्या पथकाने अटक केली. ‘अल-कायदा’च्या एका सदस्याच्या ताब्यातून चिनी हातबॉम्ब जप्त करण्यात आले.