पीटीआय, श्रीनगर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत किमान दोन दहशतवादी ठार झाले. या कारवाईत एक पोलीस आणि एक लष्करी जवान जखमी झाले असून अन्य अतिरेक्यांचा अद्याप शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोरच्या हादिपोरा भागात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त तुकडीने शोधमोहीम हाती घेतली. या वेळी अतिरेक्यांनी पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेले. या दोघांचे मृतदेह हाती आले असून त्यांची ओळख पटविण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हादिपोरामधील शोधमोहीम अद्याप सुरू असल्याची पुष्टीही अधिकाऱ्यांनी जोडली. गेल्या १० दिवसांत काश्मीरच्या रियासी, कथुआ आणि डोडा जिल्ह्यांत चार अतिरेकी हल्ले झाले असून यात नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा बैठका घेऊन काश्मीर खोरे आणि जम्मू भागात ‘शून्य दहशतवाद’ मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two terrorists killed in kashmir amy