सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक सरकारला तामिळनाडूला दोन दशलक्ष घनमीटर  (२ टीएमसी) पाणी देण्याचे निर्देश दिले. याबरोबरच या दोन राज्यांना पाण्याची किती आवश्यकता आहे, याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश केंद्रीय जल आयोगाला देण्यात आले आहेत.
याबाबत न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्रीय जल आयोगाला तीनसदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना करून पुढील दोन दिवसांत या समितीकडून या दोनही राज्यांना भेट देऊन आपला अहवाल सादर करण्यास सांगावे, असे बजावले आहे.
दरम्यान, तामिळनाडू पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने दोन टीएमसी पाणी देण्याचे आदेश खंडपीठाने कर्नाटकला दिले आहेत.
तामिळनाडूने कर्नाटककडून १२ टीएमसी पाणी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना खंडपीठाने हे आदेश दिले असून या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीचा याबाबतचा अहवाल काहीही असला तरी कर्नाटकला तामिळनाडूला दोन टीएमसी पाणी द्यायचे निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader