तेलंगणातील सरकारी सेवेत रुजू होत दोन ट्रान्सजेंडर डॉक्टरांनी इतिहास रचला आहे. डॉ. प्राची राठोड आणि डॉ. रुथ जॉन पॉल या उस्मानिया सामान्य रुग्णालयात रुजू होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर वैद्यकीय अधिकारी आहेत, अशी माहिती ‘एएनआय’ या वृत्त संस्थेनं दिली आहे. या खडतर प्रवासाबाबत डॉ. प्राची राठोड यांनी माहिती दिली आहे.
“प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीप्रमाणेच माझ्या आयुष्यातदेखील चढ-उतार होते. लहानपणी, त्यानंतर एमबीबीएसला कॉलेजमध्ये असताना आणि इमर्जन्सी फिजिशियन म्हणून काम करताना मला भेदभावाचा सामना करावा लागला. हा प्रवास नरकासारखा होता. माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावरच मी समाजाची सेवा करत आहे. मला कोणाकडूनही प्रेरणा मिळाली नाही. पण माझ्याकडून कोणी प्रेरणा घ्यावी, असं मला वाटतं”, अशी भावना डॉ. प्राची यांनी व्यक्त केली.
डॉ. पॉल यांनीही त्यांच्या संघर्षाबद्दल माहिती दिली. “मी ट्रान्सजेंडर असल्याने मला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाने मला अधिक कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा दिली. मला नातेवाईक, समाज आणि मित्रांकडून अपमानही सहन करावा लागला. मात्र, तरीही दृढ निश्चय करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं”, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं. खडतर प्रवासात पाठिंबा देणारे रुग्णालयाचे अधीक्षक आणि सर्व प्राध्यापकांचे पॉल यांनी आभार मानले.
तृतीयपंथींनी भीकच मागत राहायचं का?
“प्रत्येक अफवेकडे दुर्लक्ष करत मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं. माझ्या समाजातील अनेकांनी मला यासाठी प्रोत्साहन दिलं. उस्मानियामध्ये प्रवेश घेण्यासाठीदेखील त्यांनी मदत केली. माझ्या लहाणपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर भावाने शिक्षणासाठी खूप मदत केली. ट्रान्सजेंडर लोकांसाठी असलेल्या एक सेवाभावी संस्थेच्या क्लिनिकमध्ये मी काही काळ डॉक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर माझी उस्मानिया रुग्णालयासाठी निवड झाली”, अशी माहिती पॉल यांनी दिली आहे.
“मी २५ तृतीयपंथीयांबरोबर राहिलो कारण…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला ‘तो’ अनुभव
ट्रान्सजेंडर समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे उस्मानिया सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेंद्र यांनी कौतुक केले. “उस्मानिया रुग्णालयात ट्रान्सजेंडर क्लिनिक स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांसाठी ३६ डॉक्टरांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आम्ही तीन ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नियुक्ती केली. यामध्ये दोन ट्रान्सवुमेन तर एका एचआयव्ही ग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे”, अशी माहिती डॉ. नागेंद्र यांनी दिली आहे.