Puppies Burn Alive: माणूस हा इतर सर्व प्राण्यांपेक्षा सर्वाधिक क्रूर आहे. हे दर्शविणाऱ्या अनेक घटना आपल्यासमोर घडत असतात. क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे घडली आहे. रात्री भटके कुत्रे भुंकतात आणि त्यामुळे झोप मोड होते, या कारणास्तव दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिलांना जिवंत जाळलं. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आणि आरती नावाच्या दोन महिला कुत्र्याच्या भुंकण्यामुळं त्रस्त होत्या. रात्री झोप मोड होते, म्हणून दोघींनी पिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. मेरठच्या कंकरखेडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली असल्याची महिती तक्रारदार अंशुमली वशिष्ठ यांनी दिली. वशिष्ठ या ॲनिमल केअर सोसायटीच्या सरचिटणीस आहेत. दोन महिलांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी त्यांना हटकलं. पण या महिलांनी त्या लोकांवरच धावून जाण्याचा प्रयत्न केला. मग स्थानिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं, तोपर्यंत महिलांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. स्थानिक रहिवाशांनी मिळून मग जळालेल्या कुत्र्याच्या पिलांचे मृतदेह पुरले.
घटना घडूनही पोलिसांनी काहीच केले नाही. त्यानंतर अंशुमली वशिष्ठ यांनी काही स्थानिक मान्यवर मंडळींना घेऊन कंकरखेडा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी महिलांविरोधात तक्रार दाखल केली.
जन्म होऊन तीनच दिवस झाले होते
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या पिलांचा मरण्याच्या तीन दिवसांआधी जन्म झाला होता. या पिलांनी अद्याप डोळेही व्यवस्थित उघडले नव्हते. मात्र आरोपी महिलांनी अतिशय निर्घृणपणे पाचही पिलांवर पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकले. स्थानिकांनी या दोन्ही महिलांना सदर कृत्य केल्यानंतर जाब विचारला होता. पण त्यांनी दाद दिली नाही, तसेच पोलिसांना जेव्हा याप्रकरणाची माहिती दिली, तेव्हा त्यांनीही गंभीरपणे चौकीशी केली नाही, अशी माहिती वशिष्ठ यांनी दिली.
हे ही वाचा >> ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!
कंकरखेडा पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, आगळीक करून प्राण्यांचा खून करण्याच्या गुन्ह्यासाठी दोन्ही महिलांच्या विरोधात “प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध, कायद्या”च्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आता पुढील तपास करून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वशिष्ठ यांनी सांगितले की, हे पाचही पिले भटक्या कुत्र्यांची होती.