विभिन्नतेने नटलेला अमेरिकेसारखा देश परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुरक्षित आहे. शिवाय वर्णद्वेषाबाबत मनात भीती बाळगण्याची कोणतेही कारण नसल्याचे प्रतिपादन येथील अमेरिकेच्या दूतावासातील ज्येष्ठ मुत्सद्दय़ाने बुधवारी व्यक्त केले.
अमेरिकेत भारतीयांविरोधात झालेल्या केवळ एक दोन वर्णद्वेषाच्या घटनांमुळे अधिक घाबरायला नको, असे प्रतिपादन चेन्नई येथील अमेरिकेच्या दूतावासातील अधिकारी नेल्सन वू यांनी पत्रकारांशी बोलताना केले. अमेरिकेतील भारतीयांवर होणाऱ्या वर्णद्वेषी हल्ल्याबाबतचा प्रश्न विचारल्यावर वू यांनी भारतीयांसाठी अमेरिका सुरक्षित देश असल्याचे नमूद केले.
अमेरिकेतील विद्यापीठे देशभरात वैविध्यतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वर्णद्वेषाच्या मुद्दय़ावर भारतीय विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अमेरिकेत एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे प्रमाण केवळ चीनखालोखाल असल्याचे वू यांनी सांगितले.
यावेळी अमेरिकेतील विद्यापीठ आणि भारतीय विद्यार्थ्यांना संधी याबाबतची माहिती देताना शिक्षणानंतर अमेरिकेतच राहणाऱ्यांना नोकऱ्याही लगेचच मिळतील, असा विश्वासही वू यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U s very much safe to the indian students