भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्याचे इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच आहेत. कतार, इराण, कुवेतपाठोपाठ आता संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांनाही या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. या देशांच्या सहभागामुळे या प्रकरणावरुन भारताचा विरोध करणाऱ्या देशांची संख्या १२ वर पोहोचली आहे. यामध्ये सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, जॉर्डन, ओमान, पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक पत्रक जारी करत, ज्या गोष्टी नैतिक मुल्यांच्या आणि सिद्धांतांच्याविरोधात आहेत त्याला आम्ही विरोध करतो, असं म्हटलंय. संयुक्त अरब अमिरातीने जारी केलेल्या या पत्रकात सर्व धार्मिक प्रतीकांचा सन्मान केला गेला पाहिजे. द्वेषपूर्ण वक्तव्य पूर्णपणे हद्दपार केली पाहिजेत. एखाद्या धर्माच्या अनुयायांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य करता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.

संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्रमंत्रालयाने सहिष्णुता आणि एकत्र येऊन धार्मिक मुल्यांसंदर्भात एकत्रित जबाबदारी घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय. एखाद्या धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा वक्तव्यांपासून दूर रहायला हवं, असा सल्लाही या पत्रकातून देण्यात आलाय.

सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणाऱ्या इंडोनेशियानेसुद्धा प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. ही टीका स्वीकारण्यासारखी नाही असं इंडोनेशियाने म्हटलंय. एक पत्रक इंडोनेशियाने जारी केलं असून याची एक प्रत भारतीय दुतावासालाही पाठवण्यात आलीय.

मालदीवच्या संसदेमधील विरोधी पक्षाने गोंधळ घातल्यानंतर तेथील सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केलीय. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मोदी सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईचं स्वागत केलंय. यापूर्वी देशातील विरोधी पक्षाने यासंदर्भात एक प्रस्ताव आणला होता मात्र तो संमत करण्यात आला नाही. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाने काहीच न बोलणं हे आश्चर्यकारक असल्याचं मालदीवचे विरोधी पक्ष नेते अॅडम शरीफ उमर यांनी म्हटलं होतं.

बांगलादेशमधील शेख हसीना सरकारने या प्रकरणावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. मुस्लीम बहुसंख्यांक देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये मागील वर्षी दुर्गा पूजेदरम्यान जेव्हा मंडपांची तोडफोड झाली होती. तेव्हा शेख हसीना यांनी कठोर प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता त्यांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. भारतामध्ये असं काही होता कामा नये ज्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंवर त्यांचा परिणाम होईल, असं बांगलादेशने दुर्गा पूजेसंदर्भातील गोंधळावरुन म्हटलं होतं. बांगलादेशप्रमाणे मलेशिया आणि इराकनेही यासंदर्भात अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.