राजस्थानमधील उदयपूर येथील एका रेल्वे रुळावर स्फोटाची घटना ही दहशतवादी कृत्य असल्याचे राजस्थान पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेची चौकशी करताना पोलिसांनी यूएपीए कायद्याच्या कलम १६ आणि कलम १८ (दहशतवादी कृत्य करणे) तसेच स्फोटक पदार्थ कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यामधील वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
राजस्थानमधील उदयपूर येथील ओडा गावाजवळील रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. या स्फोटामुळे रेल्वे रुळ तुटला होता. स्फोटाचा आवाज आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गावकऱ्यांना रेल्वे रुळ तुटल्याचे आढळले. तसेच काही ठिकाणी स्फोटके आणि स्टीलचा कचरादेखील आढळून आला.
स्फोट झालेल्या रेल्वे रुळावरून अहमदाबाद-उदयपूर असवारा रेल्वे रोज धावते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला आहे. तसेच रेल्वे रुळावर स्फोटके पेरण्यात आली. जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करून देशाच्या सुरक्षेस बाधा आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी एफआरआयमध्ये नोंदवले आहे.
दोषींवर कारवाई केली जाईल
दरम्यान, या घटनेची दखल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली आहे. “उदयपूरपासून ३५ किमी अंतरावरील रेल्वे रुळावर स्फोटकं पेरण्यात आली होती. याचा तपास एटीएस, एनआयए, रेल्वे विभागाचा आरपीएफ विभाग तपास करत आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. खराब झालेल्या रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे,” अशी प्रतिक्रिया वैष्णव यांनी दिली होती.