नवी दिल्ली : सनातन धर्मावरून उग्र झालेल्या वादावर काँग्रेससह ‘इंडिया’तील प्रमुख नेत्यांनी मौन बाळगल्याने भाजपच्या हातात कोलीत मिळाले असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने सोमवारी विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान साधले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना दक्षिणेतील पक्षनेत्याच्या विधानामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी, ‘सनातन धर्म हा समता व सामाजिक न्यायाविरोधात असून या धर्माला संपवून टाकले पाहिजे’, असे विधान केले. त्यावरून भाजपने विरोधकांना लक्ष्य केले आहे.
काँग्रेस तळय़ात-मळय़ात
‘सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर काँग्रेसचा विश्वास आहे. सर्व धर्माचा काँग्रेस आदर करतो. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतंत्र विचारसरणी असते व त्यांना ती मांडण्याचा अधिकार आहे’, असे म्हणत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी संदिग्ध भूमिका घेतली. मात्र, मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेता कमलनाथ यांनी ‘उदयनिधी यांची सनातन धर्माविषयीची भूमिका मला मान्य नाही’, असे सांगितले. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री व खरगेंचे पुत्र प्रियंक खरगे यांनी मात्र उदयनिधी यांना पूर्ण पाठिंबा दिला.
हेही वाचा >>>संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये पुन्हा ‘अदानी’?
खरगे-राहुल-पवार-नितीश गप्प का?- भाजप
या वादावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजूनही भाष्य केलेले नाही. मात्र, भाजपने खरगे यांनी पूर्वी केलेल्या जाहीर विधानाची चित्रफीत व्हायरल करून काँग्रेसच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या मुद्दय़ावर शिवसेना ठाकरे गटाने उदयनिधी यांच्याविरोधात भूमिका घेतली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगले आहे.
सनातन धर्माचा अपमान हीच ‘इंडिया’ची रणनीती- धर्मेद्र प्रधान
मुंबईच्या बैठकीत ‘इंडिया’ला नेता, समन्वयक निश्चित करता आला नाही, मात्र विरोधकांनी सनातन धर्माचा अपमान करण्याचे धोरण मात्र निश्चित केले आहे. विरोधी नेत्यांमध्ये सनातन धर्माचा अपमान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केला.
हेही वाचा >>>इस्लामी आक्रमणानंतरच भारतीय महिलांवर निर्बंध; रा. स्व. संघाच्या कृष्ण गोपाळ यांचा दावा
‘इंडिया’च्या नेत्यांनी माफी मागावी -राजनाथ
‘सनातन धर्माचा अपमान केल्याबद्दल इंडियाच्या नेत्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे’, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. काँग्रेसचा मित्रपक्ष द्रमुकचे नेते सनातन धर्माचा अपमान करत आहेत. अशोक गेहलोत, सोनिया गांधी का गप्प बसले आहेत, असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी केला.
‘उदयनिधी यांनी माफी मागावी’
दिल्लीमध्ये भाजपच्या शिष्टमंडळाने तमिळनाडू सदनाला भेट देऊन राज्याच्या आयुक्तांकडे निषेध पत्र दिले आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. वीरेंद्र सचदेव, खासदार हर्ष वर्धन आणि खासदार परवेश वर्मा यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे.
हेही वाचा >>>पोटनिवडणुकांमध्ये ‘इंडिया’ची आज कसोटी
स्टॅलिन, उदयनिधी यांच्याविरोधात बिहार न्यायालयात याचिका
मुजफ्फरपूर : सनातन धर्मासंबंधी केलेल्या वक्तव्याबद्दल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात बिहारमधील मुजफ्फरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येथील वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी पंकज कुमार लाल यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप ओझा यांनी केला आहे. याबद्दलची सुनावणी १४ सप्टेंबरला होणार आहे.