गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून रान पेटवायला सुरुवात केली असताना दिग्गज नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठींमुळे त्यात अधिकत भर पडताना दिसत आहे. विरोधकांच्या एकजुटीसाठी एकीकडे ममता बॅनर्जींपासून शरद पवार व्हाया संजय राऊत अशा सर्वच नेत्यांनी कंबर कसली असताना दुसरीकडे काही जुनी नेतेमंडळी पुन्हा दिलजमाई करताना दिसू लगली आहेत. असंच काहीसं चित्र आज सकाळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या ट्वीटमुळे निर्माण झालं आहे. कारण त्यांच्या ट्वीटमध्ये थेट शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ होता!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी भेट कशासाठी?

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाशी हातमिळवणी केल्यापासून शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांआधीच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला दिलेली सोडचिठ्ठी आणि त्यानंतर साताऱ्यातून त्यांचा झालेला पराभव या गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये कमालीचा विरोध दिसून आला. मात्र, तरीदेखील उदयनराजे भोसले शरद पवारांचा उल्लेख आदराने आणि सन्मानानेच घेताना दिसून आले.

“राजकारणामध्ये महाराष्ट्र गेली ६० वर्ष शरदचंद्र दर्शन करतोय”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंची प्रतिक्रिया

उदयनराजे भोसलेंच्या ट्वीटमुळे चर्चा

गेल्या दोन वर्षांत उदयनराजे यांनी शरद पवारांवर थेट आणि तीव्र टीका करणं टाळलं आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या भेटीमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. उदयनराजे भोसले यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून या चर्चेला तोंड फोडलं आहे. या ट्वीटमध्ये उदयनराजे भोसले यांनी “आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट”, असं म्हटलं आहे. मात्र, दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतातच या उक्तीनुसार या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती ‘सदिच्छा’ चर्चा झाली, यावरून सध्या चर्चा रंगू लागली आहे.

भाजपामध्ये जाऊन देखील अनेकदा पक्षाच्या काही धोरणांवर नाराजी तर अनेकदा शरद पवारांचं कौतुक आणि आदर अशा भूमिकेमुळे उदयनराजे भोसले यांच्याविषयी नेहमीच राष्ट्रवादीशी अजूनही जवळीक असल्याचं बोललं जात आहे. त्यातच या भेटीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या घरवापसीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale meets sharad pawar in delhi creates speculations in maharashtra politics pmw