गेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र व दक्षिणेचे प्रसिद्ध अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी एका सभेत बोलताना सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी तुलना केल्यामुळे या वादाला सुरुवात झाली. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी एनडीए व प्रामुख्याने भारतीय जनता पक्षानं थेट विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीलाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून वाद वाढू लागा असताना खुद्द उदयनिधी स्टॅलिन यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?
शनिवारी उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं.
दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना “ही आघाडी भारताची संस्कृती, इतिहास व सनातन धर्माचा अपमान करत आहे”, अशी टीका केली.
उदयनिधी स्टॅलिन यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना उदयनिधी स्टॅलिन यांनी त्याचं समर्थनच केलं. “मी पुन्हा सांगतो. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली. सनातन धर्माचं उच्चाटन व्हायला हवं असं म्हणालो. मी ते पुन्हा म्हणेन. त्यांना माझ्याविरोधात जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत, ते त्यांनी करावेत”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले आहेत. “भाजपा खोट्या बातम्या पसरवत आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीमुळे घाबरले असून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.
वांशिक हत्यांना आमंत्रण?
काही सत्ताधारी नेत्यांनी उदयनिधी यांचं विधान म्हणजे वांशिक हत्यांना आमंत्रण असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काही लोक बालिश दावा करत आहेत की मी वांशिक हत्यांना आमंत्रण दिलं. तर काही म्हणतायत द्रविडम नष्ट करायला हवा. मग याचा अर्थ डीएमकेच्या लोकांची हत्या करणे असा होतो का? जेव्हा मोदी म्हणतात काँग्रेसमुक्त भारत, तेव्हा काँग्रेसच्या लोकांची हत्या करा असा त्याचा अर्थ होतो का?” असा सवाल उदयनिधी यांनी उपस्थित केला आहे.
“सनातन काय आहे? सनातन म्हणजे काहीही बदल करू नका. सगळं काही शाश्वत आहे. पण द्रविडी पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. सर्वांना समान मानलं जातं”, असं उदयनिधी स्टॅलिन एएनआयशी बोलताना म्हणाले.