शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत आता राम मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपा रामाचं राजकारण करतं आहे असं म्हणणंही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे आचार्य सत्येंद्र दास यांनी?

उद्धव ठाकरे यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात निमंत्रण का नाही? हे विचारलं असता सत्येंद्र दास म्हणाले, “आम्ही फक्त त्यांनाच निमंत्रण दिलं आहे जे रामाचे भक्त आहेत.” एएनआयला ही प्रतिक्रिया सत्येंद्र दास यांनी दिली आहे. तसंच ते पुढे म्हणाले “भाजपा रामाच्या नावावर निवडणूक लढते आहे किंवा राजकारण करते आहे असं म्हणणं गैर आहे. आपल्या देशात पंतप्रधानांचा सन्मान केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांनी राजकारण केलेलं नाही ही त्यांची भक्ती आहे.” असं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “सीता मातेने शाप मागे घेतला त्यामुळेच…”, अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रांचं वक्तव्य चर्चेत

सत्येंद्र दास यांची संजय राऊत यांच्यावरही टीका

संजय राऊत यांना इतका त्रास होतो आहे की त्यांना तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. हे तेच लोक आहेत जे रामाच्या नावावर मतं मागत होते. आता हे बकवास करत आहेत. तसंच प्रभू रामचंद्रांचा अपमान करत आहेत असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी असं म्हटलं होतं २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी त्यांना निमंत्रण मिळालेलं नाही. त्याबाबत विचारलं असता सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे की जे रामाचे भक्त आहेत त्यांनाच निमंत्रण देण्यात आलं आहे. आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray acharya satyendra das ram mandir invitation scj