बुधवारी लोकसभेमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केली आणि दिल्लीसह आख्ख्या देशाला धक्का बसला. २२ वर्षांपूर्वी याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे बुधवारी हे तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या आसनांच्या ठिकाणी उडी मारत असताना अवघ्या देशाच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, या तरुणांनी बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा अशा प्रश्नांवर घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर हा मुद्दा नागरिकांच्या समस्यांशी निगडित असल्याचं स्पष्ट होऊ लागलं. या पार्श्वभूमीवर आता या घुसखोरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटानं यासंदर्भात भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे.
लोकसभेतील घुसखोरीनंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नागरिकांना पासेस देण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. मात्र, यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या गोंधळात असभ्य वर्तनाचा शेरा मारत विरोधी पक्षाच्या तब्बल १४ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणावर सामना अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
“बिर्लाजी, या तरुणांच्या हातात एके ४७ हवी होती का?”
“मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महाशक्ती होत असल्याचे रोज सांगितले जाते, पण संसदेस महाशक्तीची मजबूत सुरक्षा व्यवस्था असताना ती भेदून दोन तरुण आत घुसतात व प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारून हाहाकार घडवतात, हे कसले लक्षण? लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला म्हणतात, ‘सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा प्रकार आहे. फार गांभीर्याने घेऊ नका’. बिर्लाजी, या तरुणांच्या हाती फक्त धुराची नळकांडी होती म्हणून बरे! २००१ प्रमाणे बॉम्ब, एके-47 असायला हवी होती काय? तरच तुम्हाला गांभीर्याने घ्यावे असा हा प्रकार वाटला असता काय?” असा सवाल ठाकरे गटानं केला आहे.
कुणी महात्मा गांधींच्या विरोधात, कुणी कृष्णभक्त काय सांगतात आरोपींचे सोशल मीडिया प्रोफाईल?
“बेरोजगारांना मोफत रामलल्लाचे दर्शन घडवून…”
“देशभरातील तरुणांत वैफल्य आहे व बेरोजगारांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवून हे वैफल्य दूर होणार नाही. महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांत तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता अमोल शिंदेसारख्या तरुणानेही एक प्रकारे आत्मघातच केला. कारण सरकारने त्याला अतिरेकी ठरवून दहशतवादविरोधी कलमांखाली अटक केली. त्यामुळे आजन्म तुरुंगात राहणे चौघांच्या नशिबी आले”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
“पास देणारा खासदार मुसलमान असता तर…”
“लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने. त्यामुळे संपूर्ण भाजपच्या तोंडास याप्रकरणी टाळे लागले आहे. हाच खासदार विरोधी पक्षाचा असता व त्यातही मुसलमान असता तर भाजपने देशात एव्हाना ‘हिंदू खतरे में’ व ‘देश खतरे में’च्या डरकाळ्या फोडत २०२४च्या प्रचाराचा नारळ फोडून घेतला असता. पाच तरुणांतील कोणी मुसलमान असता तर ‘मोदी-शहां’ना मारण्याच्या इस्लामी राष्ट्रांच्या कटाचा शंख फुंकून देशातील माहौल गरम केला असता, पण ‘पास’ देणारा भाजपचा खासदार व घुसखोर हिंदू असल्याने कार्यक्रमास रंगत चढली नाही”, अशा शब्दांत ठाकरे गटानं भाजपाला लक्ष्य केलं आहे.
संसद घुसखोरी प्रकरण : सूत्रधार ललित झाचं दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
“आता या हल्ल्यामागेही पंडित नेहरू व काँग्रेसचे धोरण कारणीभूत आहे काय? कालच्या हल्ल्यास नेहरूच जबाबदार आहेत हे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन एकदा जाहीर करून टाकावे. या हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’च्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे काय?” असा सवालही ठाकरे गटानं केला आहे.