दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे देशभरातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी केजरीवाल यांच्या अटकवरून ईडीसह केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावरही हल्लाबोल केला आहे. मद्य घोटाळ्यात सहभाग असल्याचा दावा करत ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांची २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारे अटकेची कारवाई अयोग्य असल्याचाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून यासंदर्भातम पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.
“केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर जाऊ नये यासाठी ‘ईडी’च्या माध्यमातून दहशत निर्माण केली गेली. केजरीवाल यांनी भाजपसमोर झुकण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्या सरकारी निवासस्थानात घुसून ईडीने त्यांना अटक केली. केजरीवाल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’शी हातमिळवणी केली असती तर ते अजित पवारांप्रमाणे भाजपचे नवे शंकराचार्य म्हणून नियुक्त झाले असते”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.
औरंगजेबी वृत्तीचा केला उल्लेख…
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचीच वृत्ती औरंगजेबाची असल्याचं प्रत्युत्तर दिलं. यासंदर्भात सामना अग्रलेखातूनही औरंगजेबी वृत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. “लोकांनी पूर्ण बहुमताने निवडून दिलेली सरकारे पाडता येत नाहीत तेव्हा ‘ईडी’ वगैरे यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनाच अटक करायची हे धोरण मोदी-शहांच्या सरकारने स्वीकारले आहे. यालाच हुकूमशाही म्हणतात. आचारसंहिता लागू झाली असताना निवडणुकीत उतरलेल्या सरकारविरोधकांची अशी मुस्कटदाबी करणे हे कसले लक्षण समजायचे? विरोधकांनी निवडणुकीत उतरूच नये यासाठी सुरू असलेला हा दहशतवाद आहे. औरंगजेबी वृत्ती सध्याच्या केंद्रीय राज्यकारभारात दिसत आहे”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
“दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक धक्कादायक, आश्चर्यकारक नाही. हुकूमशहा डरपोकच असतो. ‘एक अकेला सब पर भारी’ असे मोदींविषयी म्हणतात ते खरे नाही. मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरे जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात”, असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.
भाजपाला मिळालेल्या हजारो कोटींच्या देणग्यांचं काय?
अरविंद केजरीवाल यांना मद्याच्या ठेक्यांच्या बदल्यात शेकडो कोटींच्या देणग्या स्वीकारल्याप्रकरणी अटक केली असेल, तर भाजपालाही निवडणूक रोख्यांमधून अशाच प्रकारच्या हजारो कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत, असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. “केजरीवाल हे राजकीय पक्ष चालवतात व त्यांनी मद्याचे ठेके देण्याच्या बदल्यात देणग्या स्वीकारल्या असा ईडीचा आरोप आहे, पण अशा प्रकारे हजारो कोटींच्या देणग्या भाजपच्या खात्यातदेखील जमा झाल्या आहेत. निवडणूक रोखे घोटाळ्यांनी भाजपचा चेहराच ओरबाडून निघाला. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या त्या कंपन्यांकडून भाजपने जबरी वसुली करून पक्षाला निधी घेतला. गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा वळवून घेणे यालाच ‘पीएमएलए’ कायद्यात मनी लाँडरिंग म्हटले जाते. असे मनी लाँडरिंग भाजपने केले, पण भाजप व त्यांचे वसुली एजंट मोकळे असून केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह यांना अटका झाल्या आहेत”, असा मुद्दा ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.