नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजवलं गेलं. आता काही महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार असून त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून त्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी सरकार व भारतीय जनता पक्ष जाणूनबुजून मौन बाळगून असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात आता ठाकरे गटानंही भाजपाला लक्ष्य केलं आहे.
नेमकं काय घडलंय?
बनारस हिंदू विद्यापीठात एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची असून त्यातील तीन आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली आहे. हे आरोपी कोण आहेत, यासंदर्भातली माहिती समोर आली असून त्यावरून ठाकरे गटानं भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
“हे बलात्कार कांड दोन महिन्यांपूर्वी घडले, पण संबंधित गुन्हेगारांना आता म्हणजे दोन महिन्यांनी अटक झाली व अटक झाली तरी त्या नराधमांना कठोर शिक्षा होण्याची ‘गॅरंटी’ नाही. कारण बलात्कार कांडातील तीनही आरोपी भाजपच्या ‘आयटी सेल’चे मुख्य पदाधिकारी असून त्यांचे संघ शाखेवर नियमित जाणे-येणे आहे. हे बलात्कारी ‘संघ’ परिवाराशी नात्यात असल्याने दोन महिने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबावर दबाव आणून, आमिषे दाखवून प्रकरण रफादफा करण्याची योजना तथाकथित हिंदू संस्कृती रक्षक व दक्षक अमलात आणू शकले नाहीत”, असा आरोपच ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा ‘न्याय योजना’? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?
“…या प्रकरणामुळे संपूर्ण भाजपाची वाचाच गेली आहे”
“कुणाल पांडे, सक्षम पटेल व अभिषेक चौहान अशी त्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिला हिंदू आहे व बलात्कार करणारे भाजपचे पदाधिकारी आहेत. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदी, डॉ. जे. पी. नड्डा, स्मृती इराणी अशा मंडळींशी जिव्हाळा व जवळीक आहे असे स्पष्ट करणारी त्या बलात्काऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या संघ स्वयंसेवकांनी हिंदू विद्यापीठात, काशी नगरीत, मोदींच्या प्रिय वाराणसी नगरीत एका अबलेच्या इज्जतीचे धिंडवडे काढले व संपूर्ण भारतीय जनता पक्षाची त्यामुळे वाचाच गेली. हे प्रकरण एखाद्या गैरभाजपशासित राज्यात घडले असते तर भाजपच्या बजरंगी फौजांनी तेथे कूच केले असते व पाठोपाठ गृहमंत्री अमित शहादेखील तेथे पोहोचले असते”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून टीकास्र सोडण्यात आलं आहे.
“इतके मोठे दुर्योधनी कृत्य घडूनही भाजपा विपश्यनेला बसली आहे”
इतके मोठे दुर्योधनी दुष्कर्म घडूनही भाजप आता जणू विपश्यनेला बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे खरे चालचरित्र हेच आहे. नराधम हे हिरव्या लुंगीतले नसून डोक्यावर काळी टोपी व खांद्यावर भगवे उपरणे टाकून भाजपच्या अंधभक्तांचे नेतृत्व करणारे आहेत. बनारस हिंदू विद्यापीठास कलंकित करण्याचे काम भाजपच्या भक्त मंडळींनी केले. त्याचे प्रायश्चित्त कसे करणार?” असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.