पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७७ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. या भाषणात मोदींनी घराणेशाही, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांचा उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्र सोडलं. तसेच, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या नवनवीन योजना, देशाचा विकास याबाबती मोदींनी भाष्य केलं. मोदींच्या या भाषणावर विरोधकांकडून परखड शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. त्याच त्याच गोष्टी मोदी वारंवार भाषणांमधून सांगतायत, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. आता यासंदर्भात ठाकरे गटानं पंतप्रधानांवर खोचक टीका केली आहे.
“स्वातंत्र्यदिनी लोकशाहीच्या पिपाण्या वाजवणे, तिरंगा फडकवून भाषणे देणे हा एक उपचार झाला आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या ४० कोटी होती. ७७ वर्षांत आपण १४० कोटींवर पोहोचलो, पण १४० कोटी जनता स्वातंत्र्य मिळाल्याचे सुख खरोखर भोगत आहे काय? मोदी यांनी जनतेला असे आश्वासन दिले की, ‘मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ’ मात्र यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले? ते आधी सांगा”, अशा शब्दांत सामनातील अग्रलेखातून जाब विचारण्यात आला आहे.
“मोदी नाईलाज म्हणून लाल किल्ल्यावरून…”
“मोदी यांना साधारण दहा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड मिळाला, पण त्यांच्या हातून कोणतेही महान कार्य खरेच घडले काय ते शोधावे लागेल. या वेळी मोदी यांनी मणिपूरच्या हिंसाचाराचा उल्लेख लाल किल्ल्यावरील भाषणात केला. मणिपुरात लवकरच शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, पण मणिपूरच्या प्रश्नावर संसदेत विरोधक प्रश्न विचारत होते तेव्हा मणिपूरवर भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत फिरकले नाहीत. मोदींना मणिपूरवर बोलते करण्यासाठी संसदेत अविश्वास ठराव मांडावा लागला. मोदी मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर नाइलाज म्हणून लाल किल्ल्यावरून बोलले. ते बोलले नसते तर पुन्हा त्यांच्यावर हल्ले झाले असते”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
“मोदींविरुद्ध आगपाखड करणारी व्यक्ती…”, अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून मिटकरींचा राज …
भाषणात “मी पुन्हा येईन व २०२४ ला मीच तिरंगा फडकवेन” असे मोदींनी जाहीर केले. हा त्यांचा अहंकार आहे. “पुन्हा येईन” सांगणाऱ्यांची पुढे काय हालत होते ते त्यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे पाहून शिकायला हवे”, असा टोलाही ठाकरे गटानं मोदींना लगावला आहे.
“काँग्रेसचे अध्यक्ष आज गांधी कुटुंबाबाहेरचे आहेत. सोनिया गांधी यांनी राजकारणातून जवळ जवळ निवृत्ती पत्करली आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. संपूर्ण देश हाच माझा परिवार आहे. “मैं आपको भारत माता की रक्षा करते हुए मिलुंगा, जहा भी भारत मातापर आक्रमण होगा, मैं वहा आपको खडा मिलुंगा” असे राहुल गांधी सांगत आहेत व यात घराणेशाही कोठे आहे? प्रियांका गांधी या देशभरात दौरे करून लोकांना हुकूमशाहीविरोधात जागे करीत आहेत. घराणेशाहीचा शिरकाव हा भारतीय जनता पक्षात झाला आहे व ही घराणेशाही भाजपने काँग्रेसकडूनच घेतली”, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.