गेल्या तीन दिवसांपासून भाजपा नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांची जोरदार चर्चा चालू आहे. पुलवामा हल्ला होण्यापूर्वी सीआरपीएफच्या जवानांना प्रवासासाठी विमान नाकारण्यात आलं, तसेच, या प्रकरणी मोदींनी आपल्याला शांत राहायला सांगितल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. त्याशिवाय भ्रष्टाराचाचा मोदींना फारसा तिटकारा नाही, असंही मलिक म्हणाले आहेत. यावरून देशभर चर्चा चालू असताना ठाकरे गटाकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.
“तो स्फोट ३०० किलो आरडीएक्सपेक्षाही मोठा”
“३०० किलो ‘आरडीएक्स’ इतकी कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पुलवामापर्यंत पोहोचले कसे? ४० जवानांच्या निर्घृण हत्येस जबाबदार कोण? यामागचे सत्य बाहेर आले नाही, पण जम्मू-कश्मीरचे पुलवामावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सत्याचा स्फोट केला व तो स्फोट ३०० किलो आरडीएक्सपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान मोदी यांचे कश्मीरकडे दुर्लक्ष होते. तेथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे डोळेझाक केल्यामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचं मलिक म्हणाले”, असं सामनातील अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
“दुसऱ्या देशात कोर्ट मार्शलच झालं असतं”
“जम्मू-कश्मीरच्या माजी राज्यपालांची विधाने अत्यंत स्फोटक आहेत व सत्य सांगितल्याबद्दल त्यांना ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’कडून लगेच निमंत्रण येऊ शकते. जसे अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. दुसऱ्या एखाद्या देशात अशा हत्यांबद्दल त्या देशाचे संरक्षणमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे ‘कोर्ट मार्शल’च केले असते, पण ४० जवानांच्या हत्येचे खापर ठरल्याप्रमाणे पाकिस्तानवर फोडून हे लोक गप्प बसले”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
“माजी राज्यपाल मलिक यांनी स्फोटांची मालिकाच घडवली, पण गोदी मीडियाने त्यास महत्त्व दिले नाही. असा खुलासा काँगेस राजवटीत एखाद्या माजी राज्यपालाने केला असता तर भाजपने एव्हाना भ्रष्टाचार व देशद्रोहाच्या नावाने थयथयाटच केला असता, पण मलिक यांच्या विधानांना स्थान देऊ नये अशा सूचना गेल्याने माध्यमांनी सत्याकडे डोळेझाक केली. स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांच्या पायाशी गहाण टाकल्याचा हा पुरावा आहे”, अशीही टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन…”
“सत्तेच्या लोभाने भाजपास इतके मूकबधिर व अंध बनवले की, देशाच्या जवानांच्या जिवाचाच सौदा झाला. सत्यपाल मलिक यांची जम्मू-कश्मीरच्या राज्यपालपदी नेमणूक पंतप्रधान मोदी यांनीच केली होती. त्यामुळे मलिक हे विरोधी पक्षांचे पोपट आहेत असे बोलून वेळ मारता येणार नाही. गौतम अदानींच्या कारनाम्यांवर, पुलवामाच्या स्फोटक रहस्य भेदनावर, अनेक राष्ट्रीय संवेदनशील मुद्द्यांवर पंतप्रधान ‘चूप’ असतात. मौनात जाणे पसंत करतात. पंतप्रधानांचे मौन पुलवामा हल्ला व घोटाळ्याचे समर्थन करते”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
“जवानांना पोहोचविण्यासाठी सरकारने विमान दिले नाही. म्हणजे जवानांना मारून राजकीय लाभ उठवायचे हे कारस्थान होते काय? विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी फोडलेल्या चाळीस-पन्नास आमदारांना या राज्यातून त्या राज्यात हलविण्यासाठी विमाने सहज उपलब्ध होतात, पण जवानांच्या सुरक्षेसाठी विमान मिळत नाही. यालाच सध्या देशभक्ती मानले जाते”, असंही अग्रलेखात नमूद केलं आहे.