PM Modi’s Education: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या पदव्युत्तर पदविका अर्थात मास्टर्स शिक्षणाची पदवी बोगस असल्याचा दावा केला आहे. यावरून टीकाही केली जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तर गुजरात उच्च न्यायालयाने डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी केली म्हणून २५ हजार रुपयांचा दंडच ठोठावला. या सर्व पार्श्वभूमीवर सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं मोदींच्या डिग्री प्रकरणावर नेमकी भूमिका मांडली आहे. तसेच, या डिग्रीवर का संशय घेतला जातोय, यावरही मांडणी करण्यात आली आहे.
नेमका वाद काय?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात युनिव्हर्सिटीकडे माहिती कायद्यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीविषयी माहिती विचारली होती. ही मागणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठानं गुजरात उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. २०१६मध्ये तत्कालीन मुख्य माहिती अधिकार एम. श्रीधर आचार्युलु यांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीविषयी केजरीवाल यांना माहिती देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विद्यापीठाच्या याचिकेनंतर या आदेशावर स्थगिती आणण्यात आली. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
“…यात मोदींची बदनामी कशी?”
दरम्यान, या प्रकरणावरून वातावरण तापलं असताना ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे. “पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, ‘मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही’ व नंतर अचानक मोदी यांची ‘एमए’ची पदवी (Entire Political Science) समोर येते व अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची ‘डिग्री’ फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे. “पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण मोदी यांना “तुमची इयत्ता कंची?” असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे?” असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
नेमका आक्षेप का घेतला जातोय?
“मोदी जी ‘डिग्री’ दाखवत आहेत ती बनावट आहे. गुजरात विद्यापीठाने जी डिग्री मोदींची म्हणून दाखवली त्यावर ‘लिपी शैली’त Master लिहिले आहे. पण ती ‘लिपी शैली’च १९९२ साली आली व मोदींची डिग्री १९८३ सालची आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. आता त्याही पुढे जाऊ. मोदींनी १९७९ साली बी. ए. केले. १९८३ साली एम. ए. केले. मग २००५ साली त्यांनी का सांगितले की, ‘माझे काहीच शिक्षण झाले नाही?’ याचे उत्तर मोदींनी द्यायला हवे मोदींनी गुजरातच्या स्टेशनवर चहा विकला की नाही? या रहस्याप्रमाणेच मोदींची डिग्री हासुद्धा एक रोमांचक रहस्यपट आहे”, असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.
“कुणी कधीच न ऐकलेल्या विषयात डिग्री”
“देशाला शिकलेला पंतप्रधान हवा असे बोलणे यात मोदींची अशी काय बदनामी झाली? मोदींकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे व Entire Political Science हा कोणी कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी ‘एम. ए.’ केले. त्यामुळे ते ‘अनपढ’ आहेत असे कसे म्हणावे? फक्त ते त्यांची डिग्री दाखवायला तयार नाहीत”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे. संजय राऊतांनी आज सकाळीच त्यासंदर्भात एक ट्वीटही केलं असून ते सध्या व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मोदींच्या डिग्रीचा फोटो शेअर केला आहे.
संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर प्रतिक्रिया, म्हणाले, “मला वाटतं की…”
“मोदींना देशाच्या बदनामीपेक्षा स्वत:ची पडलीये”
सध्या ज्या पद्धतीचा राज्यकारभार देशात सुरू आहे, त्यामुळे जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची ‘छीःथू’ सुरू आहे. राहुल गांधी यांना बनावट खटल्यात शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या आहे व जगातील अनेक देशांनी त्यावर चिंता व्यक्त केली. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. देशाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत व त्याला जबाबदार मोदी व त्यांचे अंध भक्त आहेत. जे पंतप्रधान स्वतःचे ‘शिक्षण’ लपवत आहेत, त्यांची ‘उगाच’ बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल?” असाही खोचक सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.